केंद्र शोधायला उशीर झाल्याने स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेला अनेक उमेदवार मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 07:36 PM2023-06-16T19:36:48+5:302023-06-16T19:37:19+5:30
Nagpur News स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेसाठी गेलेल्या अनेक उमेदवारांना एक दोन-मिनिटांचा उशीर झाल्याने परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
नागपूर : स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेसाठी गेलेल्या अनेक उमेदवारांना एक दोन-मिनिटांचा उशीर झाल्याने परीक्षेपासून वंचित राहावे लागले. चंद्रपूरपासून तर नागपूर जिल्ह्यातील दूरवरच्या खेडेगावांतून आलेल्या या उमेदवारांना अनेकदा विनवणी करूनही आत साेडण्यात आले नाही. अनेक विद्यार्थी बराच वेळ परीक्षा केंद्राबाहेर रडत बसले. परंतु, त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. अखेर हे विद्यार्थी निराश होऊन माघारी परतले.
रविवारी स्टाफ सिलेक्शनची परीक्षा होती. अनेक उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले होते. नागपूर विभागातील केंद्र शहराबाहेर हिंगणा एमआयडीसी परिसरात देण्यात आले होते. दुपारी १२ वाजता परीक्षा होती. सकाळी ११:३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे निर्देश होते. परीक्षा केंद्र शहराबाहेर हाेते. तरी उमेदवार पोहोचले. परंतु, दूरवरून आलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्र शोधायला वेळ लागला. तरी काही जण ११:३१ वाजता, तर काही जण २ ते ५ मिनिटे उशिराने पोहोचले. तोपर्यंत गेट बंद झाले होते. उमेदवारांनी गेटवरील सुरक्षारक्षकांना बरीच विनवणी केली. परंतु, कुणीही ऐकायला तयार नव्हते. सर्वजण तसेच बसले. २५ मिनिटे शिल्लक असल्याने उमेदवार बसून होते. मात्र, कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यात अनेक मुलींचाही समावेश होता. अनेकजण रडतच परत गेले.
शहराबाहेर केंद्र असल्याने उशीर
परीक्षेला बसता येऊ न शकलेल्यांपैकी काही उमेदवारांनी सांगितले की, परीक्षा केंद्र शहराबाहेर होते. आम्ही बाहेरून आलोय. आम्हाला येथील रस्त्यांची माहिती नाही. विचारत पोहोचलो. तसेच रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यानेही थोडा उशीर झाला. परीक्षा देता आली नाही, याचे वाईट वाटत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. परीक्षेला २० मिनिटे शिल्लक होती. परीक्षेला बसू देता आले असते. परंतु, कुणी ऐकायला तयार नव्हते.