असंख्य कार्डधारकांना अजूनही माेफत धान्याची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:58+5:302021-07-21T04:07:58+5:30
रियाज अहमद नागपूर : काेराेना महामारीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या असंख्य कार्डधारकांना माेफत मिळणारे जुलै महिन्याचे धान्य अद्याप मिळालेले ...
रियाज अहमद
नागपूर : काेराेना महामारीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या असंख्य कार्डधारकांना माेफत मिळणारे जुलै महिन्याचे धान्य अद्याप मिळालेले नसल्याने कार्डधारकांना धान्य मिळाण्याची आस लागलेली आहे. रेशन दुकानदारांच्या मते अर्धा महिना संपेपर्यंत धान्य वितरण पूर्ण झालेले असते. मात्र जुलैचा अर्धा अधिक महिना लाेटला असताना कार्डधारकांना पंतप्रधान गरीब कल्याण याेजनेंतर्गत धान्य मिळालेले नाही.
परिस्थितीनुसार रेशन केंद्रांवर तांदळाचा पुरवठा ठप्प झाला आहे. पुरवठाच झाला नसल्याने प्राधान्य गटातील बहुतेक कार्डधारकांनाही राज्य शासनातर्फे ३ रुपये किलाेने दिला जाणारा तांदूळही मिळालेला नाही. त्यामुळे तांदळाची अपेक्षा घेऊन रेशन केंद्रावर जाणाऱ्या कार्डधारकांना निराश हाेऊन परतावे लागत आहे. अन्न पुरवठा प्रशासन मात्र अशी परिस्थिती असल्याचे खंडन करीत आहे. मात्र तांदळाच्या लिफ्टींगचे काम सुरू असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. यावरून आतापर्यंत कार्डधारकांना पूर्णपणे तांदूळ मिळालेला नाही, हेच दिसून येत आहे. विभागाच्या अशा टाळाटाळीमुळे गरीब कार्डधारकांना मनस्ताप सहन करावा लागताे आहे.
उल्लेखनीय म्हणजे गेल्या महिन्यात निकृष्ट तांदूळ मिळाल्याच्या तक्रारी समाेर आल्या हाेत्या. याच कारणामुळे तांदळाचा पुरवठा प्रभावित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाॅकडाऊनच्या कठाेर निर्बंधामुळे नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण याेजनेंतर्गत नाेव्हेंबर महिन्यापर्यंत गरीब कुटुंबांना प्रति व्यक्ती पाच किलाे तांदूळ उपलब्ध करण्याची घाेषणा केली आहे. मात्र अधिकतर कार्डधारकांना या महिन्याचा तांदूळ मिळालेला नाही.
तांदळाची लिफ्टिंग सुरू आहे
तांदळाची लिफ्टिंग याेग्य पद्धतीने सुरू असून सध्यातरी कुठलीही अडचण नाही. सर्व रेशन केंद्रावर पंतप्रधान गरीब कल्याण याेजनेंतर्गत प्रति व्यक्तीप्रमाणे तांदूळ वितरित केला जात आहे. निकृष्ट तांदळासंबंधी अशी कुठलीही तक्रार विभागाकडे नाही.
- अनिल सवई, अन्नधान्य पुरवठा अधिकारी