बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसमध्ये इच्छुक अनेक, पण गटबाजीचा अडसर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:39 AM2019-09-11T03:39:02+5:302019-09-11T03:40:01+5:30

गत तीन निवडणुकीतील पराभव लक्षात घेता यावेळी उमेदवार स्थानिकच हवा, अशी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Many in the Congress opposed to the Bawankulae, but the barrier to factionalism | बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसमध्ये इच्छुक अनेक, पण गटबाजीचा अडसर

बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसमध्ये इच्छुक अनेक, पण गटबाजीचा अडसर

Next

जितेंद्र ढवळे

नागपूर : राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या कामठी मतदार संघात सुरुंग लावताना काँग्रेसला गटबाजीने घाम फोडला आहे. त्यामुळे कामठीत बावनकुळेंपुढे उमेदवार देताना काँग्रेस नेतृत्वाचा कस लागणार आहे.

कामठीत वंचित बहुजन आघाडी आणि बसपाचा उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपाच्या मतातील अंतर येथे स्पष्ट होईल. समाजवादी पार्टीच्या उमेदवाराचेही अस्तित्व येथे दखलपात्र राहील. इकडे बरिएमं भाजपसोबत असल्याने अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांची कामठीत महत्त्वाची भूमिका राहील. पक्षसंघटन मजबूत नसले तरी या मतदार संघात काँग्रेसकडून दावेदारांची संख्या मोठी आहे. यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, प्रदेश पदाधिकारी कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, शिवसेनेला जय महाराष्ट्र करून कॉँग्रेस पक्षात आलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर कंभाले यांचा यात समावेश आहे.

गत तीन निवडणुकीतील पराभव लक्षात घेता यावेळी उमेदवार स्थानिकच हवा, अशी कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी
आहे. २००९ मध्ये पराभव झाल्यानंतर सुनीता गावंडे आणि २०१४ च्या पराभवानंतर राजेंद्र मुळक यांनी येथून कायमची एक्झिट घेतली
आहे. २०१४ च्या निवडणुकीत बसपाने येथे ऐनवेळी माघार घेतली होती. यावेळी बसपाकडून कामठी नगर परिषदेच्या नगरसेविका रमा नागसेन गजभिये या उमेदवार राहू शकतात. समाजवादी पार्टीकडून प्रदेश महासचिव परवेज सिद्धीकी किंवा माजी नगराध्यक्षा माया चौरे रिंगणात उतरू शकतात. या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता असली तरी भाजपचे पारडे तसे जड आहे.

पाच वर्षांत काय घडले?

  • कोराडी देवी मंदिर आणि तीर्थक्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर विकास.
  • या मतदार संघातील मौदा आणि महादुला नगरपंचायत निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळविला.
  • कामठी तालुक्यातील गादा येथे जिल्हा तर कोराडी येथे तालुका क्रीडा संकुलाची उभारणी.
  • मार्च २०१५ ते मार्च २०१९ या आर्थिक वर्षात कामठी विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी बावनकुळे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनातून निधी खेचून आणला. ३,३९६.२९ कोटी रुपयांच्या या विकास निधीतून रस्ते व उड्डाण पूलाची निर्मिती.

 

पाचही वर्ष सतत नागरिकांच्या संपर्कात आहे. जनता दरबार, जनसंवादच्या माध्यमातून प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. केवळ कामठी मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामांना गती दिली आहे. या कामांच्या भरवशावरच आपण यंदा विजयाचा चौकार निश्चित मारू, असा विश्वास आहे. - चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री

Web Title: Many in the Congress opposed to the Bawankulae, but the barrier to factionalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.