ड्रग माफिया आबूच्या गँगमध्ये गुन्हेगारांच्या भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 11:24 PM2019-01-09T23:24:43+5:302019-01-09T23:25:15+5:30
ताजबाग येथील गँगस्टर फिरोज खान उर्फ आबूने मादक पदार्थ एमडी (मॅफेड्रोन) च्या तस्करीतून अमाप संपत्ती आणि दबदबा कायम केला आहे. आबूच्या गँगमध्ये १२ पेक्षा अधिक गुन्हेगार जुळलेले आहेत. त्यांच्या मदतीने तो मादक पदार्थाचा मोठा व्यापारी बनला आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर करून १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताजबाग येथील गँगस्टर फिरोज खान उर्फ आबूने मादक पदार्थ एमडी (मॅफेड्रोन) च्या तस्करीतून अमाप संपत्ती आणि दबदबा कायम केला आहे. आबूच्या गँगमध्ये १२ पेक्षा अधिक गुन्हेगार जुळलेले आहेत. त्यांच्या मदतीने तो मादक पदार्थाचा मोठा व्यापारी बनला आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर सादर करून १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे.
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने रविवारी रात्री ताजबाग येथील आजादनगर येथे धाड टाकून जावेद उर्फ बच्चा अताउल्ला खान (३५) आणि तडीपार अरशद अहमद अशफाक अहमद (२१) याला अटक केली होी. तसेच त्यांच्याकडून पावने दोन लाख रुपये किमतीची ५९ ग्राम एमडी जप्त केली होती. दोघेही आबूच्या इशाऱ्यावर काम करीत होते. त्यांना आबूनेच एमडी दिली होती. ही बाब समोर येताच मंगळवारी आबूलाही अटक करून त्याच्याजवळून १५ ग्राम एमडी जप्त करण्यात आली. आबूच्या अटकेनंतर गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
सूत्रानुसार आबू अनेक दिवसांपासून मादक पदार्थाच्या तस्करीत सामील आहे. त्याचे पोलिसांसोबतही चांगले संबंध आहे. त्याचे अड्ड्यांवर शहरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे नियमित येणे जाणे असते. यामुळेच त्याला पकडण्यासाठी पोलिसांना बरीच वाट पाहावी लागली. सूत्रानुसार आबूच्या टोळीत नंबर दोनवर साजिब आहे. साजीबजवळ युवकांची मोठी फौज आहे. तो नेहमीच महाविद्यालयीन युवक-युवतींसोबत असतो. त्याच्या माध्यमातूनच आबू आणि त्याचे साथीदार युवक ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढतात. साजीबचे पोलीस आणि गुन्हेगारांशीही जवळचे संबंध आहेत. तो नवीन ग्राहकांच्या शोधासाठी नेहमीच युवकांच्या संपर्कात असतो. सुरुवातीला तो फुकटात एमडी उपलब्ध करतो. व्यसन लागल्यानंतर तो युवक साजीबचा ग्राहक बनतो. साजीबच्या टोळीत तरुणीही आहेत. त्याच्या टोळीशी संबंधित दोन बहिणींनी शहरात ‘धुमाकूळ’ घातला आहे. लहान बहीण गणेशपेठ तर मोठी बहीण गिट्टीखदान पोलीस ठाणे परिसरात राहते.
गुन्हे शाखा पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी कोकीन तस्करीत मोठी गँग पकडली होती. त्यावेळी या दोन्ही बहिणींची नावे समोर आली होती. त्यांना विचारपूस करण्यासाठी बोलावण्यातही आले होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली नाही. या बहिणींच्या माध्यमातूनच साजीबकडे मोठ्या प्रमाणावर तरुणीही एमडी खरेदी करण्यासाठी येतात.
आबूने एमडी तस्करीत मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमविली आहे. पोलीस या संपत्तीचीही चौकशी करणार आहे. आबूच्या कुटुंबाचा ताजबागमध्ये दबदबा आहे. त्यांच्याविरुद्ध कुणीही बोलायला तयार नाही. पोलीस आबू आणि त्याच्याशी संबंधित लोकांची माहिती गोळा करीत आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात साजीब, त्याच्याशी संबंधित दोन बहिणींसह अनेकांची नावे समोर आली आहेत. या लोकांच्या चौकशीतून त्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांशीही जवळचे संबंध असल्याचे आढळून आले आहे.
गांजा तस्करीही आली उघडकीस
या दरम्यान सक्करदरा पोलिसांनी आबूशी संबंधित एका तस्कर महिलेला अटक करून तिच्याकडून ११ किलो गांजा जप्त केला. झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांच्या नेतृत्वात सक्करदार पोलिसांनी आजाद कॉलनी निवासी नादिराबी अब्दुल मलिक शेखच्या घरी धाड टाकली. तेथून ११ किलो २१० ग्राम गांजा आणि १६,७०० रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी नादिराची मदत करणाऱ्या आरिफ अब्दुल मलीक शेख आणि रेहान अफजल शेख यालाही अटक केली आहे. त्यांचे आबूसोबत असलेल्या संबंधाचीही चौकशी केली जात आहे. एमडी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यावर आबूला गांजाच्या प्रकरणातही अटक होवू शकते. त्यामुळे आबूच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. डीसीपी नीलेश भरणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गांजा तस्करीच्या मुळाशी जोऊन आबू किंवा इतर कुणी यात सहभागी आहेत, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
ते पोलीस कर्मचारी झाले भूमिगत
आबू सापडल्याने त्याच्याशी संबंधित पोलीस कर्मचारी भूमिगत झाले आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांना रोजच आबूच्या अड्ड्यावर पाहिले जात होते. याचे अनेक पुरावेही आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांनाही मादक पदार्थाचे व्यसन आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यास खरा प्रकार समोर येऊ शकतो.