Corona Virus in Nagpur; उपराजधानीत अनेक बेघर व मनोरुग्ण प्रतिक्षेत; निवारे पडताहेत अपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:32 AM2020-03-31T10:32:49+5:302020-03-31T10:33:12+5:30
नागपूर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने बेघरांसाठी आणि भिकारी व मनोरुग्णांसाठी तात्पुरते निवारे उभारले असले तरी अनेक बेघर आणि मनोरुग्ण आजही रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने बेघरांसाठी आणि भिकारी व मनोरुग्णांसाठी तात्पुरते निवारे उभारले असले तरी अनेक बेघर आणि मनोरुग्ण आजही रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरात आहे. अनेकांपर्यंत या निवाऱ्यांची माहिती पोहचत नसल्याने आणि आपल्या गावाकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याने अनेकजण रस्त्यावरच वाहनांची प्रतीक्षा करत असल्याची माहिती आहे.
नागपूर महानगरपालिकेने नागरी उपजीविका अभियान आणि दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून आजघडीला १५ बेघर निवारा केंदे्र उभारली आहेत. त्यांची क्षमता १ हजार २६२ अशी आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून परप्रांतीय कामगार, बेघरांना येथे पाठविले जात असले तरी अनेक बेघर आणि परप्रांतीय कामगार रस्त्यावरच आहेत. मंदिरांसमोर मनोरुग्ण आणि भिकाऱ्यांची गर्दी असते. रात्रीही ते त्याच परिसरात मुक्कामाला असतात. बहुतेक भिकारी आता अशा ठिकाणाहून हटले असले तरी वर्धा रोडवरील साईबाबा मंदिरासमोर मनोरुग्ण आणि भिकारी असे मिळून सात व्यक्ती आजही तिथेच वास्तव्याला आहेत. समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते त्यांना अन्न देत आहेत.
अशीच स्थिती अन्य मंदिरांसमोरही कमी अधिक प्रमाणात आहे. मंदिरे बंद झाली असली तरी परिसरातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्था अन्न पुरवत असल्याने त्यांची गरज सध्यातरी भागत आहे.
परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे निघाले असले अद्यापही अनेक कामगार अडकून आहेत. प्रवासासाठी एखादे साधन मिळेल या प्रतीक्षेत ही मंडळी असल्याने शहराबाहेर त्यांचे जत्थ्ये दिसत आहेत. मध्य प्रदेशातील जौनपूर येथील २० मजूर हुडकेश्वरमधील राजापेठ बसस्थानकाजवळ सोमवारी सकाळी अडकून पडले होते. त्याच्या जेवणाचे हाल सुरू असल्याने त्यांनी मदतीसाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. गावाकडे जाण्यासाठी काहीतरी साधन मिळेल, या आशेने ते या ठिकाणी थांबले होते, अशी माहिती आहे.
बुटी कन्या शाळेचा निवारा नावापुरता
महानगरपालिकेने सीताबर्डी येथील सुपर मार्केटमागे असलेल्या बुटी कन्या शाळेत शहरी बेघर निवारा उभारला असून येथे २८ व्यक्तींच्या निवाºयाची व्यवस्था असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात हा निवारा नावापुरताच आहे. या शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. पिल्लरचेही काम सुरू असल्याने निवासासारखी सुविधा येथे शक्य नाही. तरीही महानगरपालिकेने येथे काही गाद्या टाकून विश्रांतीची व्यवस्था केली आहे. मात्र येथे सोमवारी फक्त एकच व्यक्ती थांबलेला होता.
निवारे अपुरे
शहरात उभारलेले निवारे आता अपुरे पडत आहेत. या निवाऱ्यांची क्षमता १ हजार २६२ असली तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे अनेक निवाºयांमध्ये बेडमधील अंतर वाढविले आहे. गणेशमंदिर टेकडी रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली असलेल्या गाळ्यांमध्ये ३० जणांच्या निवाऱ्यांची क्षमता असली तरी येथे बेडमध्ये अंतर राखण्यात आल्याने जेमतेम १५ ते १६ व्यक्तींच्याच निवाºयाची व्यवस्था झाली आहे. यामुळे निवारे अपुरे पडत असल्याने ते वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.