‘आरटीपीसीआर’च्या प्रतीक्षेत अनेकांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:36+5:302021-04-25T04:08:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : सुमारे दोन-तीन आठवड्यांपासून आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल उशिराने मिळत असल्याने अनेकांचा जीव टांगणीला अडकतो आहे. ...

Many lives were lost in anticipation of RTPCR | ‘आरटीपीसीआर’च्या प्रतीक्षेत अनेकांचा जीव टांगणीला

‘आरटीपीसीआर’च्या प्रतीक्षेत अनेकांचा जीव टांगणीला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : सुमारे दोन-तीन आठवड्यांपासून आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल उशिराने मिळत असल्याने अनेकांचा जीव टांगणीला अडकतो आहे. या चाचणीचा अहवाल येईपर्यंत आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ही बाब स्पष्ट होत नाही. यातच अनेक जणांचा ५ ते ७ दिवसांचा कालावधी चिंता आणि भीती यामध्ये जात असल्याने आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल तातडीने मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल उशिराने मिळत असल्याने अनेक जण अँटिजन चाचणी करीत आहेत. या चाचणीनंतर अत्यंत महत्त्वाची चाचणी म्हणून आरटीपीसीआर चाचणीकडे बघितले जाते. उमरेड तालुक्यात आतापर्यंत १५,१०८ जणांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे. अँटिजन टेस्ट करणाऱ्यांची संख्या २३,१३६ आहे. मागील काही दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी उशीर होत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम यांच्याशी अनेकदा संपर्क केल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. खानम यांच्या कार्यप्रणालीबाबत संताप व्यक्त होत आहे.

....

वाहनांची अपुरी संख्या

विविध कामांसाठी आणि कारणांसाठी एकाच वेळी धावपळ उडत असल्याने रुग्णवाहिका, वाहने आदींच्या अपुऱ्या संख्येचा विपरीत परिणाम सेवाकार्यावर पडत आहे. दुसरीकडे, आरटीपीसीआर टेस्टचे नमुने पाठविण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्यानेही विलंब होत असल्याची बाब समोर येत आहे. सध्या ऑक्सिजन सिलिंडर ने-आण करण्यासाठी दोन वाहने आहेत.

....

उद्घाटनाची घाई कशासाठी?

उमरेड येथील कोविड सेंटरचे शुक्रवारी (दि.२३) सकाळी १०.३० उद्घाटन केले गेले. उद्घाटन होताच दोन रुग्ण सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आले होते. त्यानंतर सायंकाळी आणि शनिवारी सकाळीसुद्धा अनेक रुग्ण या कोविड सेंटरमध्ये औषधोपचारासाठी आले. त्यांना अद्याप सेंटर सुरू झाले नाही, असे सांगून परत पाठविण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिल्यानंतर सुरू होणाऱ्या या कोविड सेंटरची तयारीच अपूर्ण होती, तर मग उद्घाटनाची घाई कशासाठी, असा सवाल विचारला जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचाराची गरज असताना कोविड सेंटरवरून राजकारण केले जात असल्याचा आरोप व्यक्त होत आहे.

....

जुने सेंटर बंद

शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे औषधोपचार घेत असलेल्या १८ रुग्णांना नवीन कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले. जुने कोविड सेंटर बंद करून आता नूतन आदर्श महाविद्यालयात संपूर्ण व्यवस्था केली गेली आहे. याठिकाणी रात्री ८ वाजेपर्यंत एकूण ३३ काेराेनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Many lives were lost in anticipation of RTPCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.