नागपुरात जोराच्या पावसामुळे अनेक वस्त्या जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:14 AM2020-07-02T01:14:13+5:302020-07-02T01:20:19+5:30
शहरात मंगळवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे खोलगट भागातील वस्त्या जलमय झाल्या. नागरिकांच्या घरात तर कुठे अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. दोन तासात एकाच वेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे अग्निशमन विभागाचीही चागलीच धावपळ झाली. काही नगरसेवकांनीही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात मंगळवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे खोलगट भागातील वस्त्या जलमय झाल्या. नागरिकांच्या घरात तर कुठे अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. दोन तासात एकाच वेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे अग्निशमन विभागाचीही चागलीच धावपळ झाली. काही नगरसेवकांनीही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी केल्या.
जोराच्या पावसामुळे रस्ते, वस्त्या जलमय झाल्या. अनेक चौकात पाणी साचले. रात्री ड्युटीवरून घरी परतणाऱ्यांना त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी चेंबर तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर चौकात साचलेले पाणी, चेंबरच्या पाण्याचा आपोआप निचरा झाल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. पाऊस मुसळधार बसरल्यानंतर रात्रीदेखील पावसाची रिपरिप सुरू होती. अशा परिस्थितीतही अग्निशमन विभागाचे कर्मचारी आपत्ती निवारणासाठी झटत होते.
येथे शिरले पाणी
सी.ए.सोड येथील हॉटेल अलझमझमच्या बाजूच्या घरात, मानेवाडा रोड महालक्ष्मी गल्ली नंबर ३, आ. प्रवीण दटके यांच्या घराजवळ पाणी साचले. गंजीपेठ पंचकमिटी हनुमानमंदिर येथील घरात पाणी साचले. धंतोली पोलिस ठाणे मागील घरात, दर्शन कॉलनी प्लॉट क्रमांक ६११/सी. किराणा स्टोअरजवळ, दयानंद पार्क मार्ग प्लॉट क्रमांक ९३ येथे, नरेंद्रनगर तुकाराम सभागृह घडीवाल ले-आऊट गल्ली क्रमांक ३, गणेश चौक येथील घरात, जरीपटका, रिंगरोड, भीमचौक, वैभव अपार्टमेंट परिसरात तसेच इंदिरानगर जाटतरोडी, इमामवाडी गल्ली नंबर ३ रेल्वे इलेक्ट्रिक पॉवर हाऊस येथील विहिरीत पिंपळाचे झाड कोसळून पडले.
प्रमुख चौकातही साचले पाणी
पावसाचा फटका शहरातील प्रमुख चौकांना आणि रस्त्यांनाही पडला. शहरातील मेडिकल चौकात पाणी साचले होते. तसेच, सरदार पटेल चौक, पद्मावती चौक, नंदनवन सिमेंट रोड, गंगाबाई घाटाजवळ, जगनाडे चौकात तसेच चंद्रशेखर आझाद चौकात पाणी साचले होते. दोन चेंबर तुडुंब भरून वाहत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा झाला.