शिंदेसेनेत ‘इनकमिंग’साठी अनेकांच्या रांगा; जयस्वाल-तुमाने यांचा दावा

By आनंद डेकाटे | Updated: February 17, 2025 18:48 IST2025-02-17T18:48:03+5:302025-02-17T18:48:30+5:30

Nagpur : कन्हानमध्ये २० तारखेला एकनाथ शिंदे यांची आभार सभा

Many people queue up for 'incoming' in Shinde Sena; Jaiswal-Tumane claim | शिंदेसेनेत ‘इनकमिंग’साठी अनेकांच्या रांगा; जयस्वाल-तुमाने यांचा दावा

Many people queue up for 'incoming' in Shinde Sena; Jaiswal-Tumane claim

आनंद डेकाटे, नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 'ऑपरेशन टायगर' चा विदर्भात विस्तार होण्याची शक्यता आहे. पक्षात 'इनकमिंग'साठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. अनेक लोक संपर्कात आहेत, असा दावा राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार कृपाल तुमाने यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. येत्या २० फेब्रुवारी रोजी कन्हान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत काही नेते पक्षात सामील होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात शिवसेनेचा (शिंदे) निवडणुकीत चांगलाच स्ट्राईक रेट होता. खरी शिवसेना कोणती हे जनतेने निवडणुकीतून दाखवून दिले. विधानसभेत पक्षाचे आता ६० आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्व ६० विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या कृतज्ञता (आभार) सभा आयोजित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विदर्भातील अशा प्रकारची पहिली सभा रामटेक विधानसभा मतदारसंघातील कन्हान येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्हान पोलीस ठाण्याजवळील मैदानात होणार आहे. या सभेला काही मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. इतर पक्षांचे अनेक नेते या काळात पक्षात प्रवेश करू शकतात. मात्र, कोणाला प्रवेश द्यायचा हे पक्षाचे नेतेच ठरवतील, असे सांगत जयस्वाल यांनी नाव सांगण्यास नकार दिला. स्थानिक अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतला जाईल. पण काहीही होऊ शकते. यावेळी पक्षाचे संपर्कप्रमुख मंगेश काशीकर, संदीप इटकेलवार आदी उपस्थित होते.

शरद पवारांवर शंका
राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, महाविकास आघाडीत आता कमालीची नाराजी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेवर साशंकता आहे. अशा स्थितीत महायुती आणि शिंदेसेनेकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाआघाडीच्या रुपात लढवण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. पक्षाने डिजिटल सदस्यत्व अभियान सुरू केले आहे. एकनाथ शिंदे यांना लाडका भाऊ आणि लोकांमध्ये राहणारा नेता असे संबोधून त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आपली कोणतीही नाराजी नसल्याचा दावाही केला.

Web Title: Many people queue up for 'incoming' in Shinde Sena; Jaiswal-Tumane claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.