मालामाल बनविण्याचे स्वप्न दाखवून नागपुरातील अनेकांना बनविले कंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:50 AM2019-11-01T00:50:36+5:302019-11-01T00:51:22+5:30
मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या संचालकांनी अल्पावधीतच मालामाल बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांना कंगाल केले. कोट्यवधी रुपये हडपून कंपनीचे संचालक पळून गेल्याने संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या संचालकांनी अल्पावधीतच मालामाल बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांना कंगाल केले. कोट्यवधी रुपये हडपून कंपनीचे संचालक पळून गेल्याने संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी प्रतापगनगर पोलिसांनी दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जयेंद्र बाळू पवार (वय ४५, नॅशनल प्रमोटर), ऋतुजा जयेंद्र पवार, राजकुमार शर्मा, मेघना पवार अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी आॅगस्ट २०१८ मध्ये प्रतापनगरातील कोतवाल नगरात सुपर लाईफ हेल्थ केअर कंपनी सुरू केली होती. कंपनीत अल्पावधीत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवले.
विदेशी सफर आणि मुलांना मोफत शिक्षण देण्याची विशेष ऑफर देऊन आरोपी नवनवीन ग्राहकांना जोडण्याचे (मल्टी मार्केटिंग) तंत्र गुंतवणूकदारांना सांगत होते. सुरुवातीला कंपनीच्या आरोपी संचालकांनी गुंतवणूकदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या नातेवाईकांना, ओळखीच्यांना सुपर लाईफमध्ये रक्कम गुंतवण्यास बाध्य केले. अशा प्रकारे शेकडो ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी गेल्या आठ महिन्यापासून परतावा देणे बंद केले. परिणामी कुजबुज सुरू झाली. प्रारंभी तांत्रिक अडचणीचे नाव घेणाºया आरोपींनी नंतर मात्र ग्राहकांना प्रतिसाद देणे बंद केले. एवढेच काय, कार्यालयाला कुलूप ठोकून आरोपी पळून गेले. त्यांनी फसवणूक केल्याचे उघड झाल्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहकांनी एकमेकांवर (कंपनीशी जोडणारांवर) रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. शेवटी अनेकांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. अनेकांच्यावतीने पोलिसांनी सचिन चौधरी (रा. पांडे ले-आऊट) यांची तक्रार नोंदवून आरोपी
जयेंद्र बाळू पवार, ऋतुजा जयेंद्र पवार, राजकुमार शर्मा, मेघना पवार या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.
आरोपी पुण्यात की मुंबईत ?
आरोपींनी त्यांच्या कंपनीचे मुख्यालय पुण्याच्या स्वारगेट परिसरात असल्याचे सांगितले होते. त्यात आरोपी जयेंद्र पवार हा स्वत:ला नॅशनल प्रमोटर म्हणवून घ्यायचा. त्याची पत्नी म्हणून आरोपी ऋतुजा पवार (वय ३८) कंपनीची सर्वेसर्वा, मुलूक वरिष्ठ ऊर्फ राजकुमार शर्मा (वय ३८) हा स्वत:ला सीएमडी तर मेघना चव्हाण (वय ३५) ही उच्चाधिकारी म्हणून गुंतवणूकदारांशी बोलायची. आता ते कुठे पळून गेले. ते पुण्यात आहेत, नाशिक की मुंबई त्याचा पोलीस शोध घेत आहेत.