आर्थिक संकटामुळे अनेक प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:27 AM2019-05-13T10:27:49+5:302019-05-13T10:29:06+5:30

महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील काही वर्षापासून महापालिका आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत.

Many projects stalled due to financial crisis | आर्थिक संकटामुळे अनेक प्रकल्प रखडले

आर्थिक संकटामुळे अनेक प्रकल्प रखडले

Next
ठळक मुद्देगांधीसागरसाठी आलेला निधी पडून एसटीपी, शॉपिंग मॉल, बुधवार बाजार, आरेंज सिटी स्ट्रीटचे भवितव्य अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचा चौफेर विकास होत आहे. महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील काही वर्षापासून महापालिका आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. विशेष म्हणजे ज्या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे, अशाही प्रकल्पांचा यात समावेश आहे.
शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गांधीसागर तलाव संवर्धनासाठी शासनाने १९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानतंरही हा प्रकल्प रखडला आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या खाऊ गल्लीवरील ८० लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे. बाजूला सिमेंट रोडचे काम सुरू असल्याने आता खाऊ गल्लीचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जात आहे.
शहरातील प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निर्देश दिले. अधिकाऱ्यांना यासाठी धारेवर धरले. परंतु त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. महाल व सक्करदरा येथील बुधवार बाजाराचा बीओटी तत्त्वावरील विकासाचे प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेले आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पुणे शहराच्या धर्तीवर मोक्षधाम घाटाचा विकास, आयसोलेशन हॉस्पिटलचा विकास, मौजा बाभूळखेडा रामेश्वरी येथे भाजीपाला मार्केटचा विकास, मौजा वाठोडा येथे वाणिज्यिक संकुलाचे बांधकाम, अंबाझरी उद्यानाचा, श्रीमंत राजे रघुजी भोसले सभागृहाचे नवीन बांधकाम, नगरभवन सभागृहाचे बांधकाम, नंदग्राम पशु निवारा केंद्र, गांधीबाग येथील सोख्ता भवन यासह अन्य प्रकल्पावर अनेकदा चर्चा झाली. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निर्देश देण्यात आले. परंतु त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही.
तलावांचे संवर्धन कधी?
नागपूर शहरात ११ तलाव आहेत. गांधीसागर, फुटाळा, पांढराबोडी, सक्करदरा, सोनेगाव, नाईक तलाव अशा प्रमुख तलावांच्या संवर्धनाची गरज आहे. तलावातील अनावश्यक गाळ काढून खोलीकरण करणे. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे. तलावाच्या किनाºयाचे सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे, यासाठी नियोजनाची गरज आहे. लक्ष्य निर्धारित करून अर्थसंकल्पात यासाठी तरतुदीची गरज आहे. परंतु याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत आहे.
अर्थसंकल्पात तरतूद नाही
महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा फटका शहरातील प्रस्तावित विकास प्रकल्पाना बसला आहे. पर्याय म्हणून प्रशासनाने काही प्रकल्प खासगी सहभागातून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सर्वच प्रकल्प शंभर टक्के खासगी सहभागातून राबविणे योग्य नाही. याचा विचार करता रखडलेल्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून आर्थिक बूस्टची देण्याची गरज आहे. मात्र आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेच्या प्रस्तावित अर्थसंकल्पातही प्रकल्पासाठी पुरेशी तरतूद होण्याची शक्यता दिसत नाही.
उद्यानांची निर्मिती कागदावरच
शहरात १५१ उद्याने आहेत. यातील ९१ उद्याने महानगरपालिका, ६१ नागपूर सुधार प्रन्यास, ३ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची तर एक उद्यान वन विभागाच्या मालकीचे आहे. शहराचा विस्तार व विकास विचारात घेता शहरात नवीन उद्यानांची निर्मिती करणे गरजेचे आहे. १० नवीन उद्यानांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव होता. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

..

Web Title: Many projects stalled due to financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.