रेल्वे ट्रॅकखाली बोगदा तयार झाल्याने अनेक गाड्या रद्द; काहींचे मार्ग वळविले, काही मध्येच थांबवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:34 PM2023-07-10T23:34:13+5:302023-07-10T23:34:40+5:30
प्रवाशांना तीव्र मनस्ताप; मुर्तीजापूर - माना रेल्वे मार्गावर ६२९/२८ क्रमांकाच्या पोलजवळ जोरदार पावसाने रेल्वे ट्रॅक पोखरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी सायंकाळी माना ते कुरुमदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या खाली पाण्याच्या प्रवाहामुळे बोगदा तयार झाल्याने नागपूर -मुंबई तसेच नागपूर - पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पुर्णपणे प्रभावित झाली आहे. या मार्गावरून गाडी चालविणे शक्य नसल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काहींना जागच्या जागीच थांबविण्यात आले आहे. तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहे.
मुर्तीजापूर - माना रेल्वे मार्गावर ६२९/२८ क्रमांकाच्या पोलजवळ जोरदार पावसाने रेल्वे ट्रॅक पोखरला. खालचा भाग एखाद्या बोगद्यासारखा झाला आणि मोठ्या नाल्यातून वाहावे तसे पावसाचे पाणी रेल्वे ट्रॅक खालून जोरदार प्रवाहाने वाहू लागले. त्यामुळे भुसावळ डिव्हीजनमधील अप आणि डाऊनच्या रेल्वेगाड्यांचा सायंकाळी ६.५० नंतर खोळंबा झाला. नागपूर अमरावती मुंबई, पुरी-सुरत एक्सप्रेस, नागपूर - पुणे एक्सप्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, भुसावळ-वर्धा मेमू यासह अनेक रेल्वेगाड्या प्रभावित झाल्याने काही गाड्या बडनेरा रेल्वेस्थानकावर तर काही मुर्तीजापूरच्या पुढे थांबविण्यात आल्या. काही गाड्यांचे रिशेड्युलिंग करण्यात आले. सिकंदराबाद एक्सप्रेस अकोला-नांदेड मार्गे वळविण्यात आली. या एकूणच प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लगला.
रेल्वे प्रशासनाची दिलगिरी
निर्माण झालेल्या या स्थितीला पुर्वपदावर आणण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात असून, यामुळे रेल्वे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.