जिल्ह्यात रस्त्यावरील पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले
By निशांत वानखेडे | Published: July 20, 2024 06:23 PM2024-07-20T18:23:45+5:302024-07-20T18:24:45+5:30
Nagpur : अतिवृष्टीमुळे साेयाबीन पिक, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
निशांत वानखेडे
नागपूर : शहरासाेबत नागपूर जिल्ह्यातही शनिवारी मुसळधार पावसाने झाेडपले. काही तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल जलमय झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक गावे पाण्याने वेढल्या गेल्याची माहिती आहे. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे साेयाबीन पिक, कपाशी, भाजीपाला आदी पिकांची पाण्याच्या लाेंढ्याने खरडली गेल्याने माेठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. संततधारेमुळे धानाचे राेवणेही खाेळंबले.
- नागपूर ते आंभोरा मार्गावरील माळणी येथील नाल्यावरील, तसेच कुही ते मांढळ दरम्यान चिपडी नाल्यावरील पूरामुळे आंभाेराकडील वाहतूक काही काळ बंद.
- कुही उमरेड रोड वरील आपतुर पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली.
- कामठी अंतर्गत बागडोर नाल्याला पूर आल्याने येरखेडा ,भाजी मंडी, बुनकर कॉलनी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले.
- हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या पुरात ५ मजूर अडकले. धानोली येथून वागदराकडे येतांना नाला ओलांडून वेणा नदीकडे येत असतांना मधात हे मजूर सापडले. एकीकडे नाला व दुसरीकडे वेणा नदी आणि मधोमध हे मजूर, अशी परिस्थिती हाेती.
- भिवापूर : शुक्रवारी रात्री १२ वाजतापासून सततधार पाऊस. नक्षी गट ग्रामपंचायती अंतर्गत मांगली गावात पुराचे पाणी शिरले आहे. गावाला जोडणा-या मार्गावरील नाल्यावर देखील पुराचे पाणी आल्यामुळे गावाचा ग्रामपंचायतीशी आणि तालुकास्थळाशी संपर्क तुटला. जवळी-नांद राज्य मार्गही बंद.
- अतिवृष्टीमुळे भिवापूर तालुक्यात नदी-नाल्या लगतच्या शेतातील कपाशी, साेयाबीन पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नांद धरणाचे सातही दरवाजे उघडले
मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यात नांद धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सकाळी आवश्यकतेप्रमाणे धरणाचे ७ दरवाजे ३५ से.मी. ने उघडुन धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी कुटूंबीयांची व इतर नागरीकांची, मालाची व जनावरांची योग्य खबरदारी घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कुणीही नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
तीन तालुक्यातील आजचा पाऊस
भिवापूर तालुका : आज सरासरी पाऊस ९६.४० मि.मी. १ जून ते २० जुलैपर्यंत ४१६.३६ मि.मी.
माैदा तालुका : आज सरासरी ४७.३६ मि.मी. १ जून ते २० जुलैपर्यंत ४८९.८८ मि.मी.
रामटेक तालुका : आजची सरासरी १४०.८ मि.मी. १ जून ते २० जुलैपर्यंत ४५२.१७ मि.मी.