मारबतीचे यंदाही ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:34+5:302021-09-08T04:11:34+5:30

नागपूर : ऐतिहासिक मारबत उत्सवात पिवळी-काळी मारबत आलिंगन देतानाचा क्षण दरवर्षी लाखो नागपूरकर अनुभवतात. इतवारीतील नेहरू पुतळा चौकातील हे ...

Marabati's 'physical distance' again | मारबतीचे यंदाही ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

मारबतीचे यंदाही ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

Next

नागपूर : ऐतिहासिक मारबत उत्सवात पिवळी-काळी मारबत आलिंगन देतानाचा क्षण दरवर्षी लाखो नागपूरकर अनुभवतात. इतवारीतील नेहरू पुतळा चौकातील हे दृश्य बघण्यासाठी अख्खा इतवारी परिसर खचाखच भरलेला असतो; पण कोरोनामुळे सतत दुसऱ्या वर्षी पिवळ्या-काळ्या मारबतीची भेट होऊ शकली नाही. मारबतींनीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे वस्तीतच मिरवणूक निघाली आणि नियोजित ठिकाणी त्यांचे दहन झाले. गर्दी मात्र तुफान होती.

यंदा मारबत बडग्यांची भव्य मिरवणूक नसली तरी पिवळी व काळी मारबत विसर्जनासाठी निघताना लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या आणि डेंग्यूच्या वाढत्या उद्रेकामुळे अस्वस्थ असलेल्या नागपूरकरांनी निरोप देताना कोरोना, डेंग्यूला घेऊन जागे मारबत अशी साद घातली. परंपरेनुसार पिवळ्या मारबतीची मिरवणूक तांडापेठ येथून निघाली. अवघ्या काही अंतरावरच असलेल्या पिवळी मारबत दहन भूमीत मारबतीचे दहन करण्यात आले. काळी मारबत नेहरू पुतळ्याजवळून मिरवणुकीसह निघाली. दोन्ही मारबतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी इतवारी परिसरात मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. तासाभरातच नियोजित दहनभूमीत काळ्या मारबतीचे दहन करण्यात आले. तऱ्हाने तेली समाजातर्फे साजऱ्या होणाऱ्या या मारबत उत्सवाचे यंदाचे हे १३७ वे वर्ष होते.

बिडीपेठेतही निघाली मिरवणूक

बिडीपेठ येथे सुद्धा मारबतीची मिरवणूक माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धू कोमजवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी कोरोना, डेंग्यू, मलेरियाला घेऊन जा गे मारबत असे नारे लावले. या मारबत मिरवणुकीसाठी रवी विलायतकर, गजानन कोकुडे, साहील मडावी, राम पलेरीया, रजत कावळे, स्वप्निल मिसळकर, हर्ष मडावी, सोन्या मोते, राकेश कोटेवार, गौतम मेश्राम, आदींचे सहकार्य लाभले.

दिव्यांग संघटनांनी काढला महापालिकेचा बडग्या

दिव्यांगांच्या संघटनांनी पोळ्याच्या पाडव्यानिमित्त सक्करदरा परिसरातून महापालिकेचा बडग्या काढला. दिव्यांगांच्या मागण्यांच्या संदर्भात महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महापालिकेचा निषेध म्हणून दिव्यांगांच्या संघटनेने महापालिकेच्या बडग्याची मिरवणूक काढली.

Web Title: Marabati's 'physical distance' again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.