मराठा आंदोलनाचा एसटीने घेतला धसका, रेल्वे पोलीसही अलर्ट मोडवर; विदर्भातील अनेक गाड्या मराठवाड्यात अडकून
By नरेश डोंगरे | Published: February 17, 2024 11:15 PM2024-02-17T23:15:50+5:302024-02-17T23:19:51+5:30
आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाची धग राज्य परिवहन महामंडळाला बसली आहे. संतप्त आंदोलकांकडून जाळपोळ, दगडफेक आणि रस्ता रोको होत असल्याने एसटी महामंडळाने चांगलाच धसका घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, विदर्भातील गाड्या तिकडे अडकून पडल्यामुळे ठिकठिकाणाहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या थांबविण्यात आल्या आहेत.
आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी, खास करून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. संतप्त आंदोलकांनी आपला रोष एसटी महामंडळावर काढला आहे. बस पेटविणे, दगडफेक करणे, रस्त्यात टायर जाळणे असे प्रकार घडत असल्याने एसटीचे विदर्भातील अनेक विभाग चांगलेच दडपणात आले आहे. माहूर, औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, नांदेड, किनवटकडे जाणाऱ्या गाड्या अडविण्यात आल्या आहेत. त्या परत ईकडच्या मार्गावर टाकल्यास जाळपोट, तोडफोड होऊ शकते, हे लक्षात आल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांनी या गाड्या नजिकच्या (तिकडच्या) आगारात सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक गाड्या तिकडे अडकून पडल्या आहेत. एकट्या नागपुरातील १२ गाड्या २४ तासांपासून मराठवाड्यातील वेगवेगळ्या गावात अडकून पडल्या आहेत. आणखी गाड्या पाठविल्यास त्यादेखिल तिकडे अडकून पडण्याची भीती निर्माण झाल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांनी माहूर, औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, नांदेड, किनवटकडे जाणाऱ्या फेऱ्या, ज्या ठिकाणी आंदोलनाचे लोण नाही, अशा सुरक्षित गावांपर्यंतच पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून एसटीच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणच्या पोलिसांना पत्र देऊन आंदोलनाची धग बसू नये म्हणून मोठ्या शहरातील बस स्थानकांवर सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्याची विनंती वजा मागणी केली आहे.
गस्त वाढवा, सतर्क रहा !
मराठा आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून लोहमार्ग पोलिसांनाही खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश शिर्षस्थ पातळीवरून देण्यात आले आहे. बंदोबस्त वाढवा, प्रत्येक रेल्वे गाडीवर लक्ष ठेवा, २४ तास अलर्ट रहा आणि रेल्वे लाईन, फलाटावरची गस्त वाढवा, असे आदेश आज मुख्यालयातून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, येथील रेल्वे स्थानकावरचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. डॉग स्कॉड सज्ज ठेवून गस्तही वाढविण्यात आली आहे.