मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
By योगेश पांडे | Published: September 14, 2023 05:37 PM2023-09-14T17:37:19+5:302023-09-14T17:38:57+5:30
शरद पवारांना आरक्षणावर बोलण्याचा हक्क नाही - बावनकुळे
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणावरूनराजकारण तापले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आरक्षण मिळणारच असल्याचा दावा केला. ओबीसींच्या किंवा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल, असा दावा बावनकुळे यांनी केला. गुरुवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती ती सुटणे आवश्यक होते. मुख्यमंत्री त्यांचे उपोषण सोडण्यासाठी गेले, ते सरकारचे सर्वोच्च नेते आहेत, त्यामुळे कोण गेले किवा नाही याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वपक्षीय बैठकीत जी भूमिका महायुती सरकारने मान्य केली होती. त्यानुसारच आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने भिती व संभ्रम बाळगू नये , असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. ४० वर्षे सत्तेत राहून शरद पवारांना आरक्षण देणे जमले नाही. त्यामुळे त्यांना या विषयावर बोलण्याचा हक्कच नाही. त्यांनाच या मुद्द्यावर प्रश्न विचारायला हवे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.