मराठा आंदोलन; नागपूर एसटी महामंडळाला ४० लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:55 AM2018-08-10T10:55:55+5:302018-08-10T10:59:20+5:30
मराठा आंदोलनामुळे नागपूर एसटी महामंडळाला ४० लाखांचा फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठा आंदोलनामुळे नागपूर एसटी महामंडळाला ४० लाखांचा फटका बसला. आंदोलकांनी बुधवारी रात्रीच गणेशपेठ आगारात उभी असलेली अंबड डेपोच्या बसच्या काचा फोडल्या. त्यामुळे पोलिसांनी एसटी वाहतूक बंद करण्याच्या सूचना केली. तिचे एसटी महामंडळाने पालन केले. नागपूर विभागातील ७५ टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण ८८७ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ४० लाखांचा फटका बसला.
बंदमुळे एसटी महामंडळाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. बंदची आधीच माहिती असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी गुरुवारी प्रवासाचा बेत रद्द केला होता. तर बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना बसेस बंद असल्याचे समजल्यामुळे आल्यापावली परत जाण्याची पाळी आली. सकाळी ६ ते ८ दरम्यान नागपूर विभागात काही मोजक्याच बसेस आगाराबाहेर पडल्या. परंतु मार्गात काही बसेसची हवा आंदोलकांनी सोडल्यामुळे सकाळी ९ वाजेनंतर विभागातील एकही बस डेपोबाहेर न काढण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतला. नागपूर शहरात सीताबर्डी, एलआयसी चौक आणि कॉटन मार्केट परिसरात बसेसची हवा आंदोलकांनी सोडली.
नागपूर विभागात एसटी महामंडळाच्या १३४४ बसफेºयापैकी ८८७ फेºया रद्द करण्यात आल्या. यात १ लाख १७ हजार ५२९ किलोमीटरच्या फेऱ्या महामंडळालारद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात एकूण ४० लाखांचा फटका महामंडळाला बंदमुळे बसला.
बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळावे लागले. सायंकाळी ६ वाजता एसटी महामंडळाने आपल्या बसेस वाहतुकीसाठी सोडणे सुरू केल्यामुळे प्रवाशांनी बसस्थानकाकडे धाव घेतल्याचे चित्र होते.