मराठा आंदोलन; नागपुरात पोलिसांनी वाचविले आंदोलकांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:15 AM2018-08-10T10:15:00+5:302018-08-10T10:17:44+5:30

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता मानकापूर झोपडपट्टीजवळील रेल्वे रुळावर झोपले. यावेळी दिल्लीला जाणारी भरधाव रेल्वेगाडी जवळ आलेली असताना पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून या आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Maratha movement; Police saved lives of protesters in Nagpur | मराठा आंदोलन; नागपुरात पोलिसांनी वाचविले आंदोलकांचे प्राण

मराठा आंदोलन; नागपुरात पोलिसांनी वाचविले आंदोलकांचे प्राण

googlenewsNext
ठळक मुद्देरुळावर झोपले होते १० आंदोलकमानकापूर रेल्वे रुळावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता मानकापूर झोपडपट्टीजवळील रेल्वे रुळावर झोपले. यावेळी नागपूरवरून दिल्लीला जाणारी भरधाव रेल्वेगाडी जवळ आलेली असताना मानकापूर पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून या आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नागपूर बंदचे आवाहन केल्यानंतर मराठा आंदोलक दुपारी १२.३० वाजता मानकापूर चौकाकडून जरीपटकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर गोळा झाले. तेथे ते टायर जाळून आंदोलन करीत होते. आंदोलक टायर जाळून रास्तारोको करीत असल्याचे मानकापूर पोलिसांना दृष्टीस पडताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी बाचाबाची केली.
पोलिसांनी रास्तारोकोस मनाई केल्यामुळे आंदोलक उड्डाणपुलावरून खाली उतरले. मानकापूर झोपडपट्टीच्या शेजारी असलेल्या रेल्वे रुळाकडे आंदोलक सरसावले. यातील १० आंदोलक दिल्लीकडून नागपूरला येणाऱ्या रेल्वे रुळावर झोपले. परंतु तेवढ्यात नागपूरवरून दिल्लीकडे भरधाव वेगाने रेल्वेगाडी जात असल्याचे पाहून आंदोलक त्या रुळावरून उठून नागपूर-दिल्ली मार्गाच्या रेल्वे रुळावर झोपले. यावेळी नागपूरवरून दिल्लीकडे जाणारी सुपरफास्ट रेल्वेगाडी अगदी जवळ येऊन ठेपली होती. परंतु आंदोलक रुळावरच झोपून होते.
तेवढ्यात मानकापूरचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुळावर झोपलेल्या आंदोलकांना उजव्या आणि डाव्या बाजूला ओढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, महेश माने, दीपक इंगळे, तेजसिंह शिर्के, प्रशांत मोहिते, मनोज जाधव या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची ओपन जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

Web Title: Maratha movement; Police saved lives of protesters in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.