मराठा आरक्षण; उपराजधानीत जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:13 AM2018-11-30T10:13:54+5:302018-11-30T10:38:31+5:30
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर होताच नागपुरात मराठा समाजाने जल्लोष साजरा केला. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास महाल भागातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आनंद व्यक्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर होताच राज्यभरासह नागपुरातही मराठा समाजाने जल्लोष साजरा केला. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास महाल भागातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आरक्षणाचा आनंद व्यक्त करण्यात आला.
सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी ग्रेट नाग रोड येथील एस.डी. हॉस्पिटलसमोर रस्त्यावर ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मिठाई वाटून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे दत्ता शिर्के, छोटू पवार, शितल सुरुशे, महेश महाडिक, कृष्णाजी गायकवाड, बंडूभाऊ जाधव, दीपक जाधव, हेमंत भोसले, प्रकाश खंडागळे, प्रशांत मोहिते, रमेश पवार, राजाभाऊ जाधव, नवीन चव्हाण, चंद्रशेखर जाधव आदींसह अनेक समाजबांधव सहभागी
झाले होते.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे राज्यभरात ५८ मोर्चे निघाले. ५४ लोकांना बलिदान द्यावे लागले. या बलिदानानंतर लाखो लोक रस्त्यावर आले. संघर्ष करावा लागला. या संघर्षाचे हे यश आहे.
- दत्ता शिर्के
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर केल्याबाबत सरकारचे अभिनंदन. पंरतु हे आरक्षण टिकून राहायला हवे. शिकूनही नोकरी मिळत नव्हती. आर्थिक मागासलेपण होते. भावी पिढीला फायदा होईल.
- हेमंत भोसले
आतापर्यंत सघर्ष करीत होतो. शेवटी न्याय मिळाला. मी स्वत: चार पदवी धारक असूनही नोकरी मिळू शकली नाही. आरक्षणामुळे किमान भावी पिढीला तरी त्याचा फायदा होईल.
- प्रकाश खंडागळे
मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल सर्वप्रथम सरकारचे अभिनंदन. समाजात मागासलेपणा आहे. शेवटी न्याय मिळाला. आता समाजातील मुला-मुलींना शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
- कृष्णा गायकवाड
आमच्या समाजात जे गडगंज लोक होते, ते केवळ मिशीला ताव मारत राहिले. पैसा संपला आणि गरिबी आली. परंतु आता या निर्णयामुळे भावी पिढीला तरी न्याय मिळेल.
- चंद्रशेखर जाधव
विधिमंडळात गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर नागपूर महापालिकेतील सत्तापक्षातील पदाधिकारी व नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृहाबोहर ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून आणि मिठाई वाटून एकच जल्लोष केला. महिला नगरसेवकांनी फुगडी घालून या निर्णयाचे स्वागत केले.
महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, झोनचे सभापती प्रकाश भोयर, परिवहन समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर,निशांत गांधी, विशाखा बांते, रिता मुळे, रूपाली ठाकूर, संगीता गिहे, रूपा राय,भाजपचे नेते जयप्रकाश गुप्ता यांच्यासह सत्तापक्षातील सर्व नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती. सत्तापक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.