मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांचाच, ते दोन समाजांना झुंजवत ठेवतायत: फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:28 PM2023-12-16T12:28:34+5:302023-12-16T13:06:28+5:30
भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मराठा आरक्षणावरून विरोधकांवर टीका करत आगामी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं आहे.
नागपूर : भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मराठा आरक्षणावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा राहिलेला आहे, असा घणाघात यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच आरक्षणाच्या आंदोलनाची राजकीय चिंता करण्याची आवश्यकता नाही. या गोष्टींचा निवडणुकीवर परिणाम होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात, या आंदोलनांचा सामाजिकदृष्ट्या विचार केला पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
शरद पवारांवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सध्या राज्यात मराठा आरक्षणाची मोठमोठी आंदोलने सुरू आहेत. मात्र आपण मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास काढून पाहिला तर लक्षात येतं की, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाही आपण सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य ऐकलं होतं की मराठा आरक्षणापेक्षाही राज्यात इतर मोठे प्रश्न आहेत. शरद पवारांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाही मराठा आरक्षण देता आलं असतं, पण पवारांना कधी मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना दोन समाजांना झुंजवत ठेवायचं होतं. लोकं झुंजत राहिले तर आपल्याकडे नेतेपद येईल, असं त्यांचं राजकारण आहे."
उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आरक्षण प्रश्नावरून टीका करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. "आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण आपण हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टातही आपलं सरकार असेपर्यंत हे आरक्षण टिकलं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं तर मंडल आयोगालाही विरोध केला होता. तुम्ही मंडल आयोगाला विरोध केल्यामुळेच छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि आता तुम्ही तोंड वर करून बोलताय," असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, "मराठा आरक्षण देण्यासाठी आपली कमिटमेंट पक्की आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण मराठा आरक्षणासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. मात्र हे आरक्षण देताना आपण ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. काही झालं तरी ओबीसी आरक्षणावर संकट येऊ देणार नाही," अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.