Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला
By नरेश डोंगरे | Published: October 28, 2023 07:32 PM2023-10-28T19:32:30+5:302023-10-28T19:33:09+5:30
Nagpur News: आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. त्याची धग राज्याच्या कोणकोणत्या भागात पोहोचू शकते, ते तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
- नरेश डोंगरे
नागपूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. त्याची धग राज्याच्या कोणकोणत्या भागात पोहोचू शकते, ते तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या आंदोलनाच्या आडून कुण्या समाजकंटकांनी डाव साधू नये म्हणून अत्यंत गोपनीय पद्धतीने ठिकठिकाणच्या उपद्रवींची माहिती काढली जात आहे. यासोबतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील आंदोलनाची तीव्रता कुठे कुठे राहील, अर्थात आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे राहू शकतात, त्याचीही माहिती काढली जात आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे सध्या राज्यभरात आंदोलनाची धार वाढताना दिसत आहे. ठिकठिकाणी ‘हायव्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळत आहे. नेत्यांना घेराव, कार्यक्रमात घोषणाबाजी, बैठका उधळून लावण्याचे तसेच जाब विचारण्याचे प्रकार सुरू असून, अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मंत्री आणि नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
तूर्त हे सर्व प्रकार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात होत असले तरी रोषाचा हा वणवा लवकर राज्यातील इतर भागातही पोहोचू शकतो, अशी खात्री तपास यंत्रणांना पटली आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या भागात जास्त राहील, आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे राहू शकतात. त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना करायच्या, आंदोलनाची तीव्रता कशी कमी करायची, या संबंधाने अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास यंत्रणा वर्कआऊट करत आहेत. या पार्श्वभूमीवर, ठिकठिकाणच्या खबऱ्यांची मदत घेऊन उपद्रवी वृत्तीच्या व्यक्तींची यादीही तयार केली जात आहे. या आंदोलनाच्या आडून आपले कलुषित मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवरही नजर ठेवली जात आहे.
विदर्भातील तीव्रता अधोरेखित
खास सूत्रांच्या माहितीनुसार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र झाले तरी विदर्भातील अनेक जिल्ह्यांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न फारसा गंभीर होणार नाही. तथापि, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावतीसह अन्य काही जिल्ह्यांत तीव्र स्वरूपाचे आंदोलन होणार असल्याचे सांगितले जाते.