मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:46 PM2019-07-15T12:46:10+5:302019-07-15T12:49:16+5:30
राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
लोकमज न्यूज नेटवर्क
नागपूर : राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, जुलै २०१४ मध्ये राज्यात विविध सरकारी पदांवर नियुक्ती झालेल्या नोकरदार वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार उपसली गेली आहे. जवळपास १५०० नोकरदरांच्या नोकऱ्या जाणार असून, त्यात ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
जुलै २०१४ मध्ये सरळ सेवा भरतीअंतर्गत खुल्या गटात नोकरीभरती करण्यात आली होती. मात्र, राणे समितीच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही नोकर भरती रद्द होणार असून, त्याअनुषंगाने येत्या १५ दिवसात दीड हजारावर नोकरदार नोकरीमुक्त होणार असल्याची शंका देशपांडे यांनी व्यक्त केली. त्या अनुषंगाने ब्राह्मणांच्या सामाजिक व आर्थिक समस्या सुधारण्याच्या ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्याच्या मागणीसाठी ३ ऑगस्ट रोजी नागपुरातून ‘घंटानाद आंदोलना’चा शंखनाद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांच्या व्यतिरिक्त काहीही दिले नाही. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या शहरातूनच आंदोलनाचा बिगुल फुंकण्यात येणार असून, मुख्यमंत्र्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनात शहरातील ४८ संघटना सहभागी होणार असून, यात वेदाध्ययन करणारे १०० गुरूजी एकसाथ शंखनाद करणार असल्याचे विश्वजित देशपांडे यावेळी म्हणाले. या आंदोलनात साधारणत: राज्यभरातून दहा हजारावर ब्राह्मण समाजातील नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.
अन्य मागण्या
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील भव्य स्मारक तातडीने पूर्ण करावे.
पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या श्रीवर्धन येथील जन्मस्थळाचा जीर्णोद्धार व्हावा
लंडन येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवासस्थान सरकारने विकत घेऊन स्मारक करावे
शनिवारवाडा येथे पेशवे सृष्टी निर्माण करण्यात यावी
केजी ते पीजी शिक्षण मोफत व्हावे
ग्रामीण भागातील समाजबांधवांना संरक्षण द्या
ब्राह्मण महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करावा
विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे
माहिती तंत्रज्ञान कायदा अधिक कडक व्हावा