मराठा समाजाची उद्योजक म्हणून ओळख निर्माण व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:47 AM2018-10-21T01:47:55+5:302018-10-21T01:48:41+5:30
महाराष्ट्रातील मराठा समाज हा शौर्यासाठी प्रसिद्ध आहे; पण त्याची आर्थिक स्थिती खुंटली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील उद्योजक बोटावर मोजण्याइतपत आहेत. ज्याप्रमाणे आरक्षणासाठी एकत्र आलेला मराठा समाज हा उद्योगासाठी एकत्र यावा, उद्योजक म्हणून मराठा समाजाला नवी ओळख मिळावी, यासाठी मराठा बिझनेसमन फोरम कार्यरत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील मराठा समाज हा शौर्यासाठी प्रसिद्ध आहे; पण त्याची आर्थिक स्थिती खुंटली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजातील उद्योजक बोटावर मोजण्याइतपत आहेत. ज्याप्रमाणे आरक्षणासाठी एकत्र आलेला मराठा समाज हा उद्योगासाठी एकत्र यावा, उद्योजक म्हणून मराठा समाजाला नवी ओळख मिळावी, यासाठी मराठा बिझनेसमन फोरम कार्यरत आहे.
रविभवनात शनिवारी फोरमद्वारे मराठा समाजातील नवीन उद्योजक आणि स्वत:चा व्यवसाय असलेल्या उद्योजकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजीव देशमुख, दीपक देशमुख, भानसिंग मोहिते, समीर जाधव, फोरमचे अध्यक्ष शशिकांत पवार, कार्याध्यक्ष अरुण पवार, राजेंद्र सावंत, अभिषेक सावंत, मनोहर कबले, वीरेंद्र पवार उपस्थित होते. फोरमने महाराष्ट्र आणि हैदराबाद व बंगळुरू येथे २२ चॅप्टर तयार करण्यात आले आहे. मराठा समाजातील व्यावसायिकांचे एक नेटवर्क तयार करायचे आहे. नवीन उद्योजकाला मार्गदर्शन व पाठबळ मिळवून देण्याचा फोरमचा उद्देश आहे. तसेच मराठा समाजात बोटावर मोजण्याइतके उद्योजक असले तरी, त्यांची ओळख समाजाला नाही, अशा उद्योजकांची माहिती कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात येते. २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या फोरममध्ये उद्योजक कसे घडविता येतील, समाजाला रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील. नवनवीन व्यावसायिक मॉडेलची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली असल्याची माहिती वीरेंद्र पवार यांनी दिली.