मतिमंद मुलीवर बलात्कार आरोपीस १० वर्षे कारावास
By admin | Published: August 13, 2015 03:38 AM2015-08-13T03:38:35+5:302015-08-13T03:38:35+5:30
उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास
नागपूर : उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ८ हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
रंगराव ऊर्फ रंग्या देवराव रोहणकर (२५) असे आरोपीचे नाव असून, तो उमरेड तालुक्यातील हेवती येथील रहिवासी आहे. तो ट्रॅक्टरचालक आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, १ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गावाशेजारीच पीडित मुलगी शौचास गेली होती. रंग्या हा तिच्या मागे गेला होता. त्याने जबरदस्तीने तिचे हात पकडून झुडपी जंगलात नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला होता. ही बाब पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या आई-वडिलांना सांगितली होती. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रंग्याला आपल्या घरी बोलावले असता त्याने हातपाय जोडून यापुढे असे करणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती.
१० मार्च २०१३ रोजी रात्रीच्या वेळी पीडित मुलगी शौचास गेली असता रंग्याने तिला गाठले होते. तिला जबरदस्तीने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. रात्रीचे ९ वाजूनही मुलगी घरी नसल्याचे पाहून आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. बऱ्याच वेळानंतर ती घराकडे येताना दिसली होती. वडिलांनी विचारल्यावर तिने पुन्हा रंग्याने बलात्कार केल्याचे सांगितले होते. रंग्या हा वारंवार आपल्या मुलीसोबत हे अश्लील कृत्य करीत राहील म्हणून १४ मार्च रोजी आई-वडिलांनी उमरेड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी भादंविच्या ३७६ (२) (के), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८ अन्वये गुन्हा दाखल करून १५ मार्च २०१३ रोजी रंग्याला अटक करण्यात आली होती.
पोलीस उपनिरीक्षक आर. के. राऊत यांनी पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनात तपास करून रंग्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. अडवाणी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)