पाश्चिमात्य प्रभावातून मराठी नाटक अधिक दर्जेदार : संयुक्ता थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:17 AM2019-03-28T00:17:21+5:302019-03-28T00:18:35+5:30
जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जेदारपणे सादर केल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ललित कला विभागाच्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जेदारपणे सादर केल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ललित कला विभागाच्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी व्यक्त केले.
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे ‘पाश्चिमात्य रंगभूमीचे बदलते प्रवाह आणि मराठी रंगभूमी’ या विषयावर राजाराम दीक्षित वाचनालय, धरमपेठ येथे मुक्तचर्चेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वक्ता म्हणून डॉ. थोरात आणि प्रा. शिशिर वर्मा यांनी मनोगत मांडले. संकल्पना नागपूर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांची होती. डॉ. संयुक्ता थोरात यांनी पाश्चात्त्य ‘डॉल्स हाऊस, घोस्ट’ व मराठीतील घराबाहेर, सत्वपरीक्षा अशा नाटकांचा उल्लेख करीत हा प्रभाव अधोरेखित केला. आधुनिक नाटकांचे जनक म्हणून ओळख असलेले हेन्रिक इबसन यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला चांगलेच प्रभावित केले आहे. जुन्या नाटकांप्रमाणे लांबलचक संवाद न ठेवता परिस्थितीनुसार प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्याचे कौशल्य त्यांनी साधले होते. विरोध होऊनही स्त्रीस्वातंत्र्यासारखे नवीन विचार त्यांनी मांडले. याशिवाय रशियन नाटककार स्टॅनिसलेव्हिस्कीने दिलेले अभिनयाचे तंत्र आजही स्वीकारले जाते. शेक्सपियरने साऱ्या जगाला भुरळ घातली असताना मराठी रंगभूमी त्या प्रभावापासून दूर राहिली नाही, असे मनोगत त्यांनी मांडले.
प्रा. शिशिर वर्मा यांनी १८५० पासून ऐतिहासिक परिस्थितीनुसार पाश्चात्त्य रंगभूमी आणि नाटके कशी बदलत गेली, यावर प्रकाश टाकला. आधी होणारे बदल हे संथ होते. पण यांत्रिकीकरणानंतर जगाच्या परिस्थितीत वेगवान बदल घडत गेले. पुढे साम्राज्यशाही, विविध देशांची आंतरिक स्पर्धा, पहिले व दुसरे महायुद्ध, निसर्गावर आक्रमण अशा गोष्टी झपाट्याने होत गेल्या व त्याचे पडसाद
रंगभूमीवरही पडले. कलेच्या क्षेत्रातही विज्ञान आणि भावनेचे द्वंद्व निर्माण झाले. धर्माच्या नावाने दाबल्या गेलेला स्त्रीस्वातंत्र्याचा विचार रंगभूमीतून बाहेर येऊ लागला. घडणाऱ्या परिस्थितीनुसार चांगले-वाईट बदल होत गेले, ज्याचा प्रभाव आजही बघायला मिळतो. हा इतिहास जाणून नाटकांची निर्मिती करण्याचे आवाहन प्रा. वर्मा यांनी केले. ज्येष्ठ नाटककार अनिल चणाखेकर, प्रा. सोपानदेव पिसे प्रामुख्याने उपस्थित होते. राजेश काळे यांनी आभार मानले.