मराठी नाटक जाणार ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:50 PM2020-07-11T23:50:00+5:302020-07-11T23:50:04+5:30
वेब सिरीज, चित्रपटांसाठी प्रचलित असलेल्या ‘ओव्हर दी टॉप सर्व्हिसेस (ओटीटी प्लॅटफॉर्म)’वर लवकरच मराठी नाटकेही प्रदर्शित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरज ही आविष्काराची जननी आहे आणि संकटात नित्य नवी गणिते जुळून येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगभूमीवरही अशी गणिते तयार व्हायला लागली आहेत आणि त्याच अनुषंगाने वेब सिरीज, चित्रपटांसाठी प्रचलित असलेल्या ‘ओव्हर दी टॉप सर्व्हिसेस (ओटीटी प्लॅटफॉर्म)’वर लवकरच मराठी नाटकेही प्रदर्शित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, मराठी नाट्यसृष्टीमध्ये नव्या व्यावसायिक धोरणांची दारे उघडली जाणार आहेत.
टाळेबंदीमुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद करण्यात आले आहे. त्याचा सर्वाधिक फटका नाट्य निर्माते व रंगकर्मींना बसला आहे. त्याचा परिणाम आर्थिक गणितावर झाला आहे. रंगकर्मी किमान पुढील एक वर्ष तरी बेरोजगार असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आॅनलाईन नाटक सादर करण्याचा प्रस्ताव पुणे येथील काही नाट्यसंस्थांनी दिला होता. मात्र, तो प्रस्ताव नाटकानांच बाधक असल्याने बारगळला. आता त्याही पुढे जाऊन नागपुरातील काही नाट्य निर्माते, रंगकर्मी व नाट्यसंस्थांनी व्यावसायिक गणिते बसवून टाळेबंदीतही नाटकांना उभारी देण्याचा प्रयत्न चालवला आहे. नाटकांचे चित्रिकरण करून प्रथम फेसबुकवर आणि त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते नाटक प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयोगामुळे प्रथितयश रंगकर्मींसोबतच नव्या नाट्यकर्मींनाही चेतना मिळणार आहे. तूर्तास हा प्रयोग प्राथमिक स्तरावर लवकरच कार्यान्वित होणार आहे.
तूर्तास प्रायोजक नंतर ओटीटी : देवेंद्र दोडके
गेले तीन महिने टाळेबंदीमुळे थिएटर्स बंद आहेत आणि पुढचे वर्षभर तरी उघडण्याची शक्यता नाही. थिएटर्स उघडलीही तरी प्रेक्षक संसर्गाच्या भीतीपोटी येतील का, असा सवाल आहे. अशा स्थितीत रंगकर्मी स्वस्थ बसून चालणार नाही. हाच विचार करत आम्ही एका नाटकाची तयारी चालवली आहे. एका स्टुडिओमध्ये या नव्या प्रयोगाच्या तालमी सुरू आहेत आणि तालमी पूर्ण होताच थेट सलग नाटकाचे चित्रिकरण केले जाईल. तूर्तास प्रायोजकाच्या शिफारशीवर याचा प्रयोग सोशल माध्यमावर प्रदर्शित होईल आणि त्यानंतर ज्याला प्रयोग बघायचा असेल त्याला विशिष्ट शुल्क भरावे लागेल, असा हा प्रयोग आहे. त्यानंतर ‘ओटीटी’वर नाटक प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो असल्याचे प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता देवेंद्र दोडके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.