मराठी साहित्याची मधली हजार वर्षे गायब - रवींद्र शोभणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 12:32 PM2022-11-10T12:32:36+5:302022-11-10T12:35:21+5:30
महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप
नागपूर : गाथा सप्तशंती ते महानुभाव साहित्य, असा मधला हजार वर्षाचा 'मराठीसाहित्यांचा प्रवास गायब असून त्या काळातील मराठीची लिखित परंपरा हातीच लागत नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी येथे केले.
श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी वर्षानिमित्त विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने वनामती येथे आयोजित द्वि दिवसीय महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप बुधवारी करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष. डॉ. अविनाश मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी, कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे आणि प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे उपस्थित होते.
मराठी प्रवाहाच्या मुळ स्त्रोताचे बदललेल्या परिस्थितीचे मूल्यमापन करण्याची संधी महानुभाव साहित्य संमेलनातून मिळाली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी म्हणजेच सातवाहन काळापासूनच मराठीचा वावर होता. गाथा सप्तशतीमुळे ते सिद्ध ही होते. त्यानंतर हजार वर्षानंतर थेट महानुभाव साहित्य आढळते.
या काळातील मराठीचा प्रवास सापडत नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे साहित्यही मौखिक होते आणि मग ते लिहिले गेले. ज्ञानेश्वरी प्राकृतात असली तरी तेव्हाही ती सर्वसामान्यांसाठी कठीण होती. महानुभाव परंपरेतील साहित्य हे सर्वसामान्यांना कळणारे आणि त्यांच्या जगण्याशी संबंधित विचार मांडणारे होते, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र शोभणे यांनी यावेळी केले.
डॉ. अविनाश आवलगावकर व डॉ. मदन कुळकर्णी यांनीही यावेळी आपले विचार मांडले. संचालन डॉ. राखी जाधव यांनी केले तर डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी आभार मानले.