मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता : श्रीनिवास ठाणेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:10 PM2019-01-03T22:10:30+5:302019-01-03T22:18:04+5:30
मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.
डॉ. ठाणेदार हे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या गव्हर्नरची निवडणूकही ते लढले आहेत. त्यांनी आपली आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. त्याची ५० वी आवृत्ती निघत आहे. ई वेबसाईटवर ती पाच लाख लोकांनी बघितली आहे, हे विशेष.
डॉ. ठाणेदार म्हणाले, मी एक मराठी माणूस. वडील कारकून होते. असे असताना मी अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक आहे. ५०० लोकांना मी रोजगार देतो. मी खूप मोठे काम केले असे नाही. परंतु जीवनात जे काही मिळविले ते केवळ स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवले आहे. त्यामुळेच मी माझी आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. हा सर्व व्यवसाय सुखात सुरू होता. सर्व काही सेटल होते. अशावेळी अमेरिकेत जागतिक मंदी आली आणि क्षणात २०० मिलियन डॉलरचा उभा केलेला व्यवसाय बुडाला. परंतु मी हार मानली नाही. वयाच्या ५५ व्या वर्षी पुन्हा कामाला लागलो आणि पुन्हा व्यवसाय उभा केला. या अनुभवावर आधारित मी ‘पुन्हा श्री गणेशा’ हे दुसरे पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांमध्ये माझ्या कर्तबगारीपेक्षा मला आलेल्या अपयशाचीच जास्त चर्चा आहे. त्यामुळे अपयश आले की खचू नका. हार मानू नका, त्याचा सामना करा, मार्ग नक्कीच निघेल. हा माझा अनुभव असून विद्यार्थ्यांशी सुद्धा मी हाच संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी, प्रदीप मैत्र प्रामुख्याने उपस्थित होते.
भारताची गेल्या २० वर्षात खूप प्रगती
१९८९ मध्ये मी भारत सोडला, तेव्हा भारतात फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. परंतु आता तशी परिस्थिती नाही. गेल्या २० वर्षात भारताने खूप प्रगती केली आहे. आता चांगल्या संधी आहेत. जगातील इतर हुकूमशाही देश पाहिल्यावर आपल्या भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी असल्याचा अनुभव येतो. मराठी माणसात स्कीलची कमतरता नाही थोडा आत्मविश्वास कमी असल्याचेही डॉ. ठाणेदार यांनी यावेळी सांगितले. दोन पुस्तके लिहिली असून अमेरिकेतील निवडणुकीच्या अनुभवावरही एक पुस्तक लिहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.