मराठीला निस्सीम आपलेपणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:08 PM2019-03-04T12:08:28+5:302019-03-04T12:09:51+5:30
मराठी भाषेला आज समाजाच्या निस्सीम आपलेपणाची गरज आहे, असे मत साहित्यिक व संतसाहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी संस्कृतीला टिकवण्याचे कार्य मध्ययुगीन काळात मराठी संतांनी केले. मराठी भाषेला टिकवून ठेवणे म्हणजे मराठी संस्कृतीला टिकवून ठेवणे होय. ही मराठी संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर मराठी संबंधीचा, पर्यायाने मराठी संस्कृतीसंबंधीचा आग्रह आपण जपला पाहिजे. आणि या आग्रहामागे मराठीसंबंधीची आंतरिक निष्ठा असली पाहिजे. मराठी भाषेला आज समाजाच्या निस्सीम आपलेपणाची गरज आहे, असे मत साहित्यिक व संतसाहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे डॉ.वि.भि.उपाख्य भाऊसाहेब कोलते मराठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘मराठी भाषेचे संवर्धन : दिशा आणि परिणाम’ या विषयावर त्यांनी पुष्प गुंफले.
मराठी विभागात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे हे होते. आजच्या कालखंडात मराठी भाषेच्या अस्तित्वासंबंधी विविध प्रकारचे प्रश्न समाजामध्ये पहावयास मिळतात. मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर उत्सवी प्रकारचे कार्यक्रम व वरपांगी स्वरूपाचे दिखावटी सोहळे पुरेसे नाहीत. त्याऐवजी अगदी घरगुती पातळीवर मराठीपणा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषा ही केवळ भाषिक आविष्कारामधून आविष्कृत होत नाही तर ती मराठीपणा कायम ठेवणाऱ्या सण-उत्सवांमधून, सांस्कृतिक चालीरीतींमधून, परंपरेने चालत आलेल्या रूढीसंकेतांमधून देखील अभिव्यक्त होत असते. त्यामुळे आहारविहार, पोशाख-परंपरा, पारंपरिक विधी, सण-उत्सव, नृत्य-संगीत, गीतपरंपरा, संतवचने इत्यादी घटकांमधून मराठी संस्कृती आज टिकवून ठेवण्याची गरज आहे, असेदेखील घळसासी म्हणाले.
डॉ.शैलेंद्र लेंडे यांनी मराठीचा इतिहास व संवर्धनासाठी झालेले आजवरचे प्रयत्न यावर भाष्य केले. डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अमृता इंदूरकर यांनी संचालन केले तर डॉ.प्रज्ञा निनावे यांनी आभार मानले.