मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी मराठी माणसाचीच

By admin | Published: February 28, 2017 02:11 AM2017-02-28T02:11:59+5:302017-02-28T02:11:59+5:30

जागतिकीकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेबरोबरच अन्य भाषांपुढेही मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत.

Marathi people are responsible for the promotion of Marathi language | मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी मराठी माणसाचीच

मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी मराठी माणसाचीच

Next

मराठी भाषा गौरव दिन : माहिती केंद्राच्या कार्यक्रमात वक्त्यांचे प्रतिपादन
नागपूर : जागतिकीकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेबरोबरच अन्य भाषांपुढेही मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा परिस्थितीत मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी मराठी माणसांचीच आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करू या, असे आवाहन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
विभागीय माहिती केंद्र व मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी विभागीय माहिती केंद्राच्या सभागृहात कविवर्य वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाय, पत्रकार शैलेश पांडे, विभागीय सहायक भाषा संचालक हरेश सूर्यवंशी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाये म्हणाल्या, आपले मत, आपले विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे सशक्त माध्यम म्हणजे भाषा. कवी वि.वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस मराठी गौरव दिन म्हणून साजरा करतो.
हे ऋण फेडण्यासारखेच आहे. आपल्या संवादाची भाषा मराठी आहे. तिचा अभिमान बाळगला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत असले तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मराठी भाषेची निवड करू शकता.
हरेश सूर्यवंशी म्हणाले, मराठी भाषा विभागातर्फे पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन शब्दकोषासह विविध मराठीतील शब्दकोष विभागातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. इंग्रजीला पर्यायी शब्द उपलब्ध होत असल्यामुळे मराठी भाषा ही समृद्ध होण्यास मदत होत आहे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करण्याची आवश्यकता आहे.
अनिल गडेकर म्हणाले, सोशल मीडिया तसेच नवीन माध्यमांमध्ये इंग्रजीबरोबरच मराठीचा वापर करण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध भाषा असली तरी आज मराठीचा वापर फार कमी प्रमाणात होत आहे. भाषा ही व्यक्तिमत्त्वाला वळण देत असल्याने मायबोलीचा अभिमान सर्वांनीच बाळगायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार शैलेश पांडे म्हणाले, मराठी भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. ती जेवढी समृद्ध तेवढीच संस्कृती अधिक समृद्ध बनत जाते. इंग्रजी येणं म्हणजे ज्ञानी असल्याचं लक्षण आहे, असे नाही. भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेच्या बळावरच माणूस जीवनात कितीही मोठा पल्ला गाठू शकतो, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: Marathi people are responsible for the promotion of Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.