पंतप्रधानांपर्यंत जाण्याची मराठी माणसाची लायकीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 08:02 PM2018-01-04T20:02:58+5:302018-01-04T20:10:47+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविणारे डॉ.अक्षयकुमार काळे यांनी चक्क मराठी माणसाच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरात केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविणारे डॉ.अक्षयकुमार काळे यांनी चक्क मराठी माणसाच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरात केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.
६ व ७ जानेवारी रोजी होणाऱ्या या चर्चासत्रात राज्यभरातून साहित्यिक व मराठी अभ्यासक उपस्थित होणार आहेत. या चर्चासत्राच्या अखेरीस उपस्थित अभ्यासकांच्यावतीने केंद्राकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी निवेदन करण्यात येणार आहे. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येईल, असे डॉ.काळे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येईल. मात्र पंतप्रधानांना थेट निवेदन देणे शक्य होणार नाही. कारण मराठी लोकांची पंतप्रधानांपर्यंत जाण्याची लायकीच नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. विशेष म्हणजे पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजक मराठी विभाग तसेच मराठी विभाग माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही. अशा स्थितीत डॉ.काळे यांचे वक्तव्य आश्चर्यचकित करणारे आहे.