मराठी भाषिक उमेदवारांना फटका
By admin | Published: June 20, 2017 01:51 AM2017-06-20T01:51:48+5:302017-06-20T01:51:48+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करणाऱ्या उमेदवारांना संशोधन कार्यपद्धतीचे ‘कोर्सवर्क’ करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नागपूर विद्यापीठ : ‘पीएचडी कोर्सवर्क’ची परीक्षा इंग्रजीतच, मराठीत संशोधन करणाऱ्यांची अडचण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करणाऱ्या उमेदवारांना संशोधन कार्यपद्धतीचे ‘कोर्सवर्क’ करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ‘कोर्सवर्क’च्या अभ्यासक्रमावर आधारित ‘आॅनलाईन’ परीक्षादेखील घेण्यात येते. मात्र ही परीक्षा इंग्रजीतच असल्यामुळे मराठीत संशोधन करणाऱ्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कुलगुरूंनी तत्काळ कार्यवाही करून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ची बजबजपुरी माजली आहे. संशोधनाचा स्तर वाढावा यासाठी ‘युजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) अगोदरच पावले उचलली होती. नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे ‘पीएचडी’च्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्यकता वाटत होती. त्यामुळे यासंदर्भात नागपूर विद्यापीठानेदेखील मागील वर्षी नवीन नियमावली जारी केली होती. यानुसारच ‘पीएचडी’साठी नियमांनुसार संशोधन पद्धतीवर ‘कोर्सवर्क’ आवश्यक करण्यात आले. या ‘कोर्सवर्क’चा ६० तासांचा अभ्यासक्रम विद्यापीठाकडून तयारदेखील करण्यात आला आहे. याची उमेदवारांना ‘आॅनलाईन’ परीक्षादेखील द्यावी लागले.
मात्र संबंधित अभ्यासक्रम हा इंग्रजीतच उपलब्ध आहे. अगदी इंग्रजी विषयदेखील यात समाविष्ट आहे. मात्र अनेक उमेदवारांच्या संशोधन लेखन व प्रबंधाची भाषा मराठी असते. अनेकांना तर इंग्रजीची आवश्यकतादेखील भासत नाही. मात्र अभ्यासक्रमात समाविष्ट असल्यामुळे त्यांना विनाकारण इंग्रजीत अभ्यास करावा लागत आहे. यामुळे अनेक मुद्दे समजतच नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे आता ‘कोर्सवर्क’च्या परीक्षेत नकारात्मक गुण देण्यात येणार आहेत. अशा स्थितीत इंग्रजीतील प्रश्नच समजला नाही तर काय करायचे, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. विद्यापीठाने मराठी भाषिक व मराठीतून संशोधन करणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा. तसेच परीक्षा मराठी माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात ‘अॅकेडॅमिक स्टाफ कॉलेज’च्या संचालकांना पत्रदेखील पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता अशी तक्रार माझ्यापर्यंत आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसारच ‘कोर्सवर्क’चा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे व परीक्षादेखील त्याचपद्धतीने होत आहे. मराठीत शिकविण्यात आले तर इतर भाषेत संशोधन करणाऱ्यांवर अन्याय होईल. प्रश्नपत्रिका मराठीत उपलब्ध करून देण्याबाबत विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.