मराठी रंगभूमी दिन : वैदर्भीय रंगकर्मींच्या एकतेची घोषणा तेव्हाच हवेत विरली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 07:17 PM2019-11-05T19:17:13+5:302019-11-05T19:25:31+5:30
रंगकर्मींनी एकत्र यावे, अशी ओरड अनेक वर्षांपासून आहे, तसे उपक्रमही राबविण्यात आले. मात्र, प्रयत्न तोकडे पडल्याने आणि त्यात संबंधितांचाच स्वार्थ अधिक असल्याने, तो ‘सोनियाचा दिनू’ कधीच उगवला नाही.
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रंगकर्मींनी एकत्र यावे, अशी ओरड अनेक वर्षांपासून आहे, तसे उपक्रमही राबविण्यात आले. मात्र, प्रयत्न तोकडे पडल्याने आणि त्यात संबंधितांचाच स्वार्थ अधिक असल्याने, तो ‘सोनियाचा दिनू’ कधीच उगवला नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी असे प्रयत्न एका विदर्भवादी संघटनेने केले होते. मात्र, निवडणूक आटोपताच त्यांना रंगकर्मींचा विसर पडला आणि वैदर्भीय रंगकर्मींच्या एकतेची घोषणा तेव्हाच हवेत विरली. मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर, असे प्रयत्न पुन्हा होतील का आणि त्याला रंगकर्मी दाद देईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोणत्याही आंदोलनाला बळकटी देण्यासाठी, त्यातील प्रत्येक घटकांना न्याय देणे गरजेचे असते. कलावंतांना हाताशी धरले तर त्याचा प्रभाव सकारात्मक होईल, असा मानस २०१४ मध्ये ‘जनमंच’ या विदर्भवादी स्वयंसेवी संस्थेचा झाला. त्याअनुषंगाने त्यावेळेसच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २२ जून २०१४ रोजी नागपुरात काँग्रेसनगर येथील एका कार्यकर्त्याच्या घरी प्रथमच ‘वैदर्भीय नाट्य कलावंतांचा मेळावा’ भरविण्यात आला होता. रंगकर्मींचा आवाज मोठा असल्याने, विखुरलेल्या रंगकर्मींना एकत्र आणायचे आणि पृथक विदर्भाच्या आंदोलनाला बळकटी द्यायची, असा तो हेतू होता. यासाठी संपूर्ण विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून रंगकर्मी उपस्थितही झाले. आंदोलनाच्या अनुषंगाने दरवर्षी असा मेळावा जिल्हास्तरावर घ्यायचा आणि नागपुरात भव्य सोहळा करायाचा, अशी घोषणाही त्यावेळी करण्यात आली होती. मात्र, रंगकर्मींच्या विकासासाठी आणि त्यांच्या उपक्रमांना वाव देण्याची कोणतीही घोषणा झाली नव्हती. मनस्वी कलावंतांना ही बाब रुचणारी नव्हती. मिळेल त्या मार्गाने आपला उदरनिर्वाह सांभाळत, कलेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या कलावंतांना विदर्भवाद्यांचा हा स्वार्थ कळला आणि तो गेली पाच वर्षे प्रकर्षाने दिसूनही आला. त्याचेच कारण म्हणून या मेळाव्यात घोषणा करूनही, त्यानंतर कधीच असला मेळावा आयोजित झाला नाही किंवा साधा उल्लेखही करणे टाळले गेले. आतापर्यंत इतर राजकीय पक्ष कलावंतांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत होते.
त्यात विदर्भवाद्यांचीही भर पडल्याने, रंगकर्मींचा हिरमोड झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, रंगकर्मींना स्वार्थासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न करू पाहणारे विदर्भवादी आता स्वत:च विखुरलेले असल्याचे दिसून येत आहे.
वैदर्भीय रंगपीठ निर्माण होईल का?
याच मेळाव्यात वैदर्भीय रंगकर्मींसाठी ‘वैदर्भीय रंगपीठ’ उभारण्याची घोषणा झाली होती. मात्र, संवाद माध्यमात अतिशय निष्णात असलेल्या जनमंच आणि रंगकर्मीतर्फे त्यासाठी कधीच प्रयत्न झालेले नाही. नाट्य अभिव्यक्तीतून इतरांना प्रबोधनाचे डोस पाजणारा रंगकर्मी संवादाचा वापर केवळ हेवेदाव्यासाठी करण्यातच व्यस्त आहे. तर, वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन उगारणाऱ्या जनमंचचा प्रभाव ओसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, वैदर्भीय रंगपीठासाठी आता कोण पुढाकार घेईल, असा प्रश्न मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.