दीक्षाभूमीतील सदस्य निवडीसाठी मॅरेथॉन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:03+5:302021-09-04T04:12:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीच्या चार सदस्यांच्या निवडीसाठी मॅरेथॉन बैठक पार पडली. शुक्रवारी तब्बल सहा तास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीच्या चार सदस्यांच्या निवडीसाठी मॅरेथॉन बैठक पार पडली. शुक्रवारी तब्बल सहा तास चाललेली ही बैठक बरीच वादळी ठरली. परंतु सदस्य निवडीवर मात्र शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची बैठक कोरोनानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी आयोजित करण्यात आली.
समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागर्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत सचिव डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, एन. आर. सुटे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होणार होती. परंतु सदस्यांची निवड हा सर्वांसाठीच मुख्य विषय होता. स्मारक समितीमध्ये एकूण चार जागा रिक्त आहेत. या जागांवर नवीन सदस्यांची निवड व्हायची आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता बैठकीला सुरुवात झाली. ती रात्री ८.१५ वाजता संपली. तब्बल सव्वासहा तास ही मॅरेथॉन बैठक चालली. परंतु बैठकीत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक सदस्याकडून एकेका नावाची शिफारस आली. बरीच चर्चा झाली. त्यामुळे एकमत हाेऊ शकले नाही. येत्या काही दिवसात सदस्यांची नावे निश्चित करण्यात येतील, असे सांगितले जाते.