मराठवाडा, खान्देशात हेलिकॉप्टरने बीजारोपण
By admin | Published: May 22, 2017 05:04 PM2017-05-22T17:04:17+5:302017-05-22T17:04:17+5:30
राज्यात रोपवनाची घसरलेली टक्केवारी वाढविण्यासाठी मराठवाडा, खान्देशसह विदर्भातील भीषण दुष्काळ, उजाड रानमाळ असलेल्या भागात हेलिकॉप्टरने बीजारोपण केले जाणार आहे.
गणेश वासनिक ।
अमरावती : राज्यात रोपवनाची घसरलेली टक्केवारी वाढविण्यासाठी मराठवाडा, खान्देशसह विदर्भातील भीषण दुष्काळ, उजाड रानमाळ असलेल्या भागात हेलिकॉप्टरने बीजारोपण केले जाणार आहे. त्याकरिता वनमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून पावसाळ्यापूर्वीच हे बीजारोपण केले जाईल.
राज्य शासनाने १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत होणाऱ्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यातील काही भागांत हेलिकॉप्टरने बीजारोपण करण्याची तयारी चालविली आहे. राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: हेलिकॉप्टरमध्ये बसून दुष्काळ, उजाड रानमाळातील डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये आकाशातून बीजारोपण करणार आहेत.
बीजारोपण करण्यापूर्वी कोणत्या भागात ते करावयाचे आहे, तो संपूर्ण परिसर सॅटेलाईट, नकाशाद्वारे हेलिकॉप्टरशी जोडला जाईल. चार आसनी हेलिकॉप्टरमध्ये वनमंत्री मुनगंटीवार, वनसचिव विकास खारगे आदी विराजमान असतील, अशी माहिती आहे. जंगलक्षेत्र नसलेल्या भागातच बीजारोपण केले जाणार आहे. त्याकरिता मराठवाडा, खान्देश, विदर्भातील दुष्काळी भागाचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी वनविभागाकडे सोपविण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वीच हेलिकॉप्टरने बिजारोपण केले जाणार असल्याने जून महिन्याच्या ८ ते १० तारखेदरम्यान हा उपक्रम राबविला जाईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. ज्या हेलिकॉप्टरमधून बीजारोपण होईल, ते सॅटेलाईटशी जोडले जाणार असून अद्ययावत नकाशेदेखील यात राहतील.