मराठवाडा, खानदेशाच्या तुलनेत विदर्भात मृत्यू कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 08:51 PM2020-08-21T20:51:37+5:302020-08-21T20:53:45+5:30
पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात ऑगस्ट महिन्यात वाढलेल्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे. यात गुरुवारी मृत्यूची संख्या हजारावर गेली. परंतु पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे. २० ऑगस्टपर्यंत खानदेशात १८५५, मराठवाड्यात १३२० तर विदर्भात १०४३ मृतांची नोंद झाली. विदर्भात मृतांची ही संख्या गाठायला १६२ दिवस लागले.
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारावर रुग्णांची भर तर ३० ते ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून येत आहे. या जिल्ह्यात ७०० ते १००० दरम्यान रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे, तर २५ ते ४० दरम्यान रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गुरुवारी या जिल्ह्याची रुग्णसंख्या १७,७२२ तर मृतांची संख्या ६२५वर गेली. याच्या निम्मेही रुग्ण किंवा मृत्यूची नोंद विदर्भाच्या इतर जिल्ह्यात झालेली नाही. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात आहेत. येथील रुग्णांची संख्या ४,१६१ आहे. असे असले तरी नागपूरनंतर सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात १४१ मृत्यूची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात मृतांची संख्या १०० आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ५०च्या आत मृतांची संख्या आहे. सर्वात कमी मृत्यूची नोंद गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे आतापर्यंत एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
- सर्वाधिक मृत्यू मुंबई विभागात
आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागाअंतर्गत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर येथे गुरुवारपर्यंत एकूण १२,०९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर विभागाच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू याच विभागात आहेत. पुणे विभागातील कोल्हापुर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात ५,१४१ मृत्यूची नोंद झाली. नाशिक विभाग म्हणजे, खानदेशातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात १८५५ रुग्णांचे मृत्यू झाले. औरंगाबाद विभाग म्हणजे, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात १३२० तर विदर्भातील नागपूर विभागात ६७५ व अमरावती विभागात ३६८असे एकूण १०४३ मृत्यू झाले आहेत.
-विदर्भात अशी वाढली मृत्यूसंख्या
विदर्भात पहिल्या मृत्यूची नोंंद मार्च महिन्यात बुुलडाणा जिल्ह्यात झाली. त्यानंतर मृतांची संख्या वाढतच गेली. एप्रिल महिन्यात १२, मे महिन्यात ९१, जुलै महिन्यात २२९ तर २० ऑगस्टपर्यंत ६५६ रुग्णांचे मृत्यू झाले. एकूणच विदर्भात रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.९२ टक्के आहे. यात साधारण ६० टक्के पुरुष तर ४० टक्के महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्य ५० ते ९० या वयोगटात झाले आहेत.