मरावे परी ‘अवयव’रूपी उरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:20 AM2017-08-09T02:20:51+5:302017-08-09T02:21:35+5:30

निसर्गाने मानवाला अवयवांच्या रूपात अनेक मौल्यवान गोष्टी अगदी नि:शुल्कपणे भेट दिल्या आहेत.

Marave fairy 'organisms' should be left | मरावे परी ‘अवयव’रूपी उरावे

मरावे परी ‘अवयव’रूपी उरावे

googlenewsNext
ठळक मुद्देअंजली भांडारकर यांनी घेतली अवयवदानाची शपथ : इतरांमध्येही जागृतीचा प्रयत्न

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गाने मानवाला अवयवांच्या रूपात अनेक मौल्यवान गोष्टी अगदी नि:शुल्कपणे भेट दिल्या आहेत. मात्र मृत्यूनंतर जाळून किंवा पुरून हे अनमोल अवयव नष्ट केले जातात. हा कुठला धर्म आहे? त्यापेक्षा आपल्या शरीरातील ही निसर्गाची भेट इतरांना दिली तर अवयवांची प्रतीक्षा करणाºया अनेकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात आणि मृत्यूनंतरही अवयवांच्या रूपात इतरांमध्ये जिवंत राहिले जाऊ शकते. हा विचार स्वत: अवयवदानाची शपथ घेऊन इतरांमध्ये रुजविण्याची धडपड डॉ. अंजली भांडारकर करीत आहेत.
डॉ. अंजली भांडारकर हे नाव फार परिचित नसले तरी त्यांनी घेतलेला संकल्प मोठा आणि प्रेरणा देणारा आहे. डॉ. अंजली यांनी अवयवदानाची माहिती मिळताच आठ वर्षांपूर्वी स्वत:च्या शरीरातील अवयव दान करण्याची शपथच घेतली. त्यांनी मोहन फाऊंडेशनच्या माध्यमातून मेंदूमृत अवस्थेत नेत्रदान, अवयवदान आणि मरणोत्तर देहदानाचे स्वेच्छापत्र भरून घेतले. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत तब्बल ३४ वेळा रक्तदानही केले आहे. केवळ फॉर्म भरून त्या थांबल्या नाहीत तर, आपल्याला मिळालेला प्रकाश इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे. अवयवदानासंबधी कुठल्याही संस्था, संघटनेच्या कार्यक्रमात त्या जातात. स्वत: घेतलेला संकल्प इतरांना सांगतात व अवयवदानाचे महत्त्व पटवून इतरांना त्यासाठी प्रवृत्त करतात. देवाच्या कीर्तनापेक्षा हे मार्गदर्शन मोलाचे आणि महत्त्वाचे आहे, असे त्यांचे ठाम मत.
वास्तविक दान हा शब्द त्यांना मान्य नाही. शरीरातील अवयव मौल्यवान असले तरी ते निसर्गाने मोफत दिलेली भेट आहे. त्यामुळे ही भेट आपण फार तर शेअर किंवा अर्पण करू शकतो, अशी त्यांची प्रामाणिक भावना. त्यात जातीधर्माचे बंधन नाही आणि हिंदू-मुस्लीम असा भेदही नाही. हाच खरा मानवधर्म असल्याचे त्या सांगतात.
मेंदूमृत झालेली व्यक्ती फार तर दोन-चार दिवस जगू शकते व मृत्यू अटळ आहे. त्यावेळी त्याच्या शरीराचे अवयव चांगल्या स्वरूपात असतात. अशावेळी कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला तर गरजू व्यक्तींना फायदा होऊ शकतो. शरीरातील किडनी, यकृताचा भाग, हृदयाचे व्हॉल्व, आतडे, डोळे, स्कीन आदी आठ अवयव दान केले जाऊ शकतात. त्यामुळे इतर आठ व्यक्तींच्या शरीरात अवयवांच्या रूपात मृत व्यक्ती जिवंत राहू शकते. हो मात्र अवयवांच्या व्यवसायावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्या म्हणतात.
अवयवदानाची संस्कृती रुजणे आवश्यक
भारतात लोक अवयव घेण्यासाठी उत्सुक असतात, मात्र देण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे देशात अवयवांची गरज असलेल्यांची प्रतीक्षा यादी फार मोठी आहे. त्यापेक्षा परदेशात रुग्णालयातील डॉक्टर निर्णय घेऊन मेंदूमृत व्यक्तींचे अवयव इतरांना दान करतात. त्यामुळे स्पेन, अमेरिकेसारख्या प्रगत देशात गरजूंची प्रतीक्षा यादी नाही. भारतात मात्र मृत्यू होईपर्यंत प्रतीक्षा केली जाते व नंतर देह जाळल्या जातो. आपल्याकडे अवयवदानाची संस्कृती रुजणे आवश्यक आहे. नातेवाईकांनी सकारात्मक निर्णय घेतला तर आपला प्रिय व्यक्ती ते इतरांमध्ये बघू शकतात. हे उदात्त दान म्हणजे मृत्यूनंतरही टिकणारी निरपेक्ष मैत्री होय असे वाटते.
- डॉ. अंजली भांडारकर

Web Title: Marave fairy 'organisms' should be left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.