७ मार्च रोजी मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:37 PM2020-03-05T20:37:01+5:302020-03-05T20:37:45+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी ते ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी ते ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने ७ मार्च रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात हे आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष अतिथी असतील, अशी माहिती गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान देण्यात आली.
या समारंभादरम्यान ‘वैद्य’कीय या गौरविकेचेदेखील प्रकाशन होईल. यात मा. गो. वैद्य यांचे विविध लेख, त्यांच्याबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना यांचा समावेश आहे. गौरविका ही एकूण चार भागात विभाजित करण्यात आली आहे. माधव नेत्रालयाच्या पुढाकाराने होणाऱ्या या समारंभासाठी विशेष समितीदेखील गठित करण्यात आली आहे. मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारोह समितीचे अध्यक्षपद विलास डांगरे यांच्याकडे आहे. डॉ. अविनाश अग्निहोत्री, निखिल मुंडले, प्रशांत चौधरी, श्यामकांत पात्रीकर, दिलीप चौधरी हे पत्रपरिषदेला उपस्थित होते.