सरकारी कार्यालयात मार्च एण्डिंगची धावपळ
By admin | Published: April 1, 2015 02:34 AM2015-04-01T02:34:31+5:302015-04-01T02:34:31+5:30
आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरच्या दिवशी ३१ मार्चला कोषागार कार्यालयात देयके सादर करण्यासाठी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
नागपूर : आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरच्या दिवशी ३१ मार्चला कोषागार कार्यालयात देयके सादर करण्यासाठी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. रात्री ८वाजेपर्यंत नागपूर कोषागार कार्यालयात १३७७ देयक (२९४ कोटी५३ लाख रुपयांची) प्राप्त झाली होती. जिल्हा नियोजन कार्यालयासह इतरही विभागात मंगळवारी मार्च ‘एण्डिंग’ची धावपळ दिसून आली.
अर्थसंकल्पीय निधी दर महिन्याला थेट आॅनलाईन स्थानांतरित होत असल्याने पूर्वीसारखी आता स्थिती उरली नसली तरीही दरवर्षी ३१ मार्चला कोषागार कार्यालयात देयकं सादर करण्यासाठी झुंंबड उडतेच. यंदाही ३० मार्चपासून या कार्यालयात हीच स्थिती आहे. एरवीपेक्षा या दोन दिवसात कार्यालयाकडे सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी दोन ते अडीच हजार देयक सादर झाली. देयके सादर करण्यासाठी कार्यालयात गर्दी झाली होती. सायंकाळी ७ वाजेपर्यंत देयक स्वीकारण्याची मुदत होती. नेमका आकडा विचारण्यासाठी उपजिल्हा कोषागार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला. मुख्य कोषागार अधिकाऱ्यांच्या भेटीची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे तपशील कळू शकला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची पाच कोटींची देयके मंजूर झाली. जिल्हा नियोजन विभागानेही चार कोटीच्या देयकांना मंजुरी दिली. उत्पादन शुल्क विभागातही आज प्रचंड गर्दी होती. (प्रतिनिधी)