थंडी संपली अन् उन्हाचे चटके सुरू; रात्री गारव्याच्या प्रभावाने दिवसाचा ताप अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 12:29 PM2022-03-14T12:29:04+5:302022-03-14T12:42:00+5:30
हवामान तज्ज्ञांच्या मते या वर्षी तापमान सामान्यच आहे; पण रात्री गारव्याच्या प्रभावाने दिवसाचा ताप अधिक जाणवताे आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : मार्च महिना म्हटले की उन्हाळ्याची जेमतेम सुरुवात हाेते. मात्र या वर्षी सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून त्याचे चटके अधिक जाणवायला लागले आहेत. त्यामुळे ‘या वर्षी जास्त तापमान आहे काय?’ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; पण नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते या वर्षी तापमान सामान्यच आहे; पण रात्री गारव्याच्या प्रभावाने दिवसाचा ताप अधिक जाणवताे आहे.
हवामान विभागाच्या रेकाॅर्डनुसार मार्च महिन्यात नागपूरसह विदर्भाचे तापमान दिवसागणिक वाढते आणि शेवटपर्यंत ते ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त अंशँपर्यंत पाेहोचते. या काळात दिवस आणि रात्रीच्या तापमानांत माेठे अंतर असते. भाैगाेलिक स्थितीमुळे तिन्ही बाजूंना असलेले समुद्र व तापमानवाढीमुळे या महिन्यात पावसाची शक्यताही अधिक असते. मात्र या वर्षी स्थिती सामान्य असूनही अधिक चटके बसत आहेत.
हवामानतज्ज्ञ सुरेश चाेपणे यांच्या मते मागील काही वर्षांत हिवाळा पुढे सरकला असून या वर्षीही तीच स्थिती आहे. शिवाय बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यामध्ये आर्द्रता जाणवत आहे. त्यामुळे अद्यापही रात्री हवेत गारवा जाणवताे. रात्रीच्या गारव्यामुळे दिवसाचा ताप अधिक वाटताे आहे. मात्र पुढे तापमान वाढणार असून, एप्रिलपासून ताे असह्य हाेणार असल्याचा अंदाज आहे. एप्रिलच्या सुरुवातीला वळवाच्या पावसाची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
१८९२ मध्ये ताप, १९५७ साली पाऊस
हवामान विभागाच्या अहवालानुसार नागपुरात १२५ वर्षांपूर्वी २८ मार्च १८९२ राेजी तापमान आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ४५ अंशांवर हाेते. ४ मार्च १८९८ राेजी सर्वांत कमी ८.३ अंश तापमानाची नाेंद झाली हाेती. मार्चमध्ये कधी-कधी पावसानेही तडाखा दिला आहे. १९५७ साली मार्च महिन्यात चक्क १०४ मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती, जी पावसाळ्याप्रमाणेच म्हणावी लागेल. २६ मार्च १८६१ राेजी एकाच दिवशी ४५ मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती, हेही उल्लेखनीय.
- मार्च महिन्याचा विचार केल्यास या दशकात २०१७ व २०१९ च्या ३१ मार्चला सर्वाधिक ४३.३ अंश तापमानाची नाेंद झाली.
- अकाेल्यात ३० मार्च २०१७ राेजी ४४.१ अंश, ३१ मार्च २०१९ रोजी ४३.६ अंश, २७ मार्च २०१६ रोजी ४३.१ अंश, तर ३० मार्च २०२१ रोजी ४२.८ अंश तापमान नाेंदविले.
दशकभरात मार्चमध्ये नागपूरचे तापमान
वर्ष - २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१
सर्वाधिक तापमान - ४०.६ ४०.६ ४०.२ ४०.१ ४०.९ ४३.३ ४१ ४३.३ ३७.६ ४१.९
किमान तापमान - १४.२ १०.५ १४.६ १२.९ १६.४ १३.७ १७.२ १४.२ १५.३ १५.४