मार्डचा कामबंद आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:56 AM2020-10-03T00:56:37+5:302020-10-03T00:57:45+5:30
Mard, doctors, strike, Nagpur News कोरोनाचा संसर्ग झाल्याने परीक्षेला बसू न शकलेल्या एका निवासी डॉक्टरची पुन्हा परीक्षा घेण्यास महाराष्ट् आरोग्य विज्ञान विद्यापीठ टाळटाळ करीत असल्यावरून निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग झाल्याने परीक्षेला बसू न शकलेल्या एका निवासी डॉक्टरची पुन्हा परीक्षा घेण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ टाळटाळ करीत असल्यावरून निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. तसे पत्र मेडिकलच्या अधिष्ठात्यांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले.
‘मार्ड’नुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अस्थिव्यंगोपचार विषयात पदव्युत्तर शिक्षण (पीजी) घेत असलेले निवासी डॉक्टर रोहित गर्ग यांची ७ सप्टेंबर रोजी ‘पीजी’ची प्रॅक्टिकलची परीक्षा होती. परंतु ६ सप्टेंबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. याची माहिती मेडिकलच्या अधिष्ठात्यांना देण्यात आली. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना याबाबत कळविले. महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठालाही याची माहिती देण्यात आली. कोरोनाबाधित असल्याने डॉ. गर्ग यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येर्ईल, असे आश्वासन देण्यात आले. १५ सप्टेंबर रोजी डॉ. गर्ग यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे विद्यापीठाला पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. परंतु विद्यापीठाने न्यायालयात जाण्यास सांगितले. यामुळे मार्डने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, या विद्यार्थ्याची परीक्षा घेणे शक्य नाही. आज कोरोना आहे, पुढील वर्षी आणखी कुठल्यातरी आजाराने विद्यार्थी आजारी पडतील आणि पुन्हा परीक्षा घेण्याचा दबाव आणतील. यामुळे न्यायालयाने आदेश दिले तरच परीक्षा घेणे शक्य आहे.
आश्वासन पाळायला हवे
मार्डचे अध्यक्ष डॉ. अर्पित धकाते यांनी ‘लोकमत’ला सांगितले, निवासी डॉक्टर २४ तास कोरोनाबाधितांना सेवा देत आहेत. अशावेळी त्यांना कोरोनाची लागण होऊन परीक्षेपासून वंचित ठेवणे योग्य नाही. विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी कोरोनाच्या या काळात विशेष बाब म्हणून परीक्षा घेणे आवश्यक आहे. मागील १५ दिवसांपासून आम्ही मागणी विनंती करीत आहोत, परंतु कोणी लक्ष देत नसल्याने नाईलाजाने आंदोलनाचा इशारा द्यावा लागला आहे.