झेंडू, शेवंती @ ६०, गुलाब ३०० ते ५०० रुपये! पूजा, सजावटीच्या फुलांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 09:28 PM2021-11-03T21:28:52+5:302021-11-03T21:29:29+5:30
Nagpur News झेंडू आणि शेवंती फुलांची आवक वाढल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाव अर्ध्यावर आले आहेत. त्याप्रमाणात ग्राहकांची संख्याही वाढली आहे.
नागपूर : दसरा ते दिवाळीपर्यंत पूजेच्या आणि सजावटीच्या फुलांना जास्त मागणी असते. दसरा आणि दिवाळीत तीन दिवस फुलांची सर्वाधिक विक्री होते. झेंडू आणि शेवंती फुलांची आवक वाढल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाव अर्ध्यावर आले आहेत. त्याप्रमाणात ग्राहकांची संख्याही वाढली आहे. माळा, हार तयार करण्यासाठी किरकोळ दुकानदारांनी धनत्रयोदशीपासून फुलांची खरेदी सुरू केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी थोडेफार भाव वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
झेंडू गेल्यावर्षीच्या १२० ते १५० रुपयांच्या तुलनेत यंदा ५० ते ६० रुपये किलो, शेवंती २५० ते ३०० रुपयांच्या तुलनेत ६० ते ७० रुपये, निशिगंधा ५०० रुपयांच्या तुलनेत २५० ते ३०० रुपये आणि देशी गुलाब गेल्यावर्षीप्रमाणे ३०० ते ४०० रुपये किलो आहेत. सीताबर्डी नेताजी मार्केट येथील महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, झेंडू आणि शेवंती फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे यंदा भाव उतरले आहेत. बुधवारी १५० गाड्या (एक गाडी हजार किलो) झेंडू आणि शेवंतीच्या ७ गाड्यांची (एक गाडी २५०० किलो) आवक झाली. अतिवृष्टीमुळे गुलाब शेतातच खराब झाल्यामुळे आणि आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत.
गेल्यावर्षी झेंडू आणि शेवंती फुलांना जास्त भाव मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली; पण यंदा पीक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे भावात घसरण झाली आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता झेंडूचे भाव ३० ते ३५ रुपये किलो, तर त्यानंतर दिवसभर ५० ते ६० रुपये भावाने विकला गेला. झेंडूमध्ये लोकल, कोलकाता, नवरंग माल येत आहे. याशिवाय देशी गुलाब आणि डिवाईन गुलाबाचे भाव ३०० ते ४०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. सध्या निशिगंधा फुलांची आवक कमी आहे. याशिवाय कुंदा फुलांच्या माळा (जास्मीन प्रकार, सोबत गुलाब) किलोनुसार ४०० ते ७०० रुपयांपर्यंत भाव आहेत. तसे पाहता दसऱ्यापेक्षा दिवाळीत फुलांची मागणी कमी असते. केवळ घर सजावट आणि पूजेसाठी फुले लागतात. व्यापारी पंचमीला पूजा करीत असल्याने त्या दिवशी मागणी वाढते.
फुलांची आवक नागपूर जिल्ह्याच्या ७० ते ८० किमी परिसरातून आणि नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, नाशिक येथून होत आहे. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणात येत आहे. दिवाळीच्या दिवसात चोहोबाजूने फुलांची आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले आहेत. होलसेल फूल बाजारात किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यानुसार दुकानदारही कोरोना नियमांचे पालन करीत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत असून, सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत असल्याचे रणनवरे यांनी सांगितले.
होलसेल बाजारात फुलांचे भाव (किलो)
- झेंडू ५० ते ६० रुपये
(लोकल, कोलकाता, नवरंग)
- शेवंती ६० ते ७० रुपये
- गुलाब ३०० ते ४०० रुपये
(देशी, डिवाईन)
- निशिगंधा २५०-३०० रुपये