कारागृहात चरस तस्करी करणारा निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:46+5:302021-01-23T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्यासाठी अमली पदार्थाची तस्करी करणारा आरोपी पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मधुकर सोळंकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्यासाठी अमली पदार्थाची तस्करी करणारा आरोपी पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मधुकर सोळंकी (२९) याला आज निलंबित करण्यात आले. दरम्यान, धंतोली पोलिसांनी सुस्तपणा दाखवल्याने त्याला न्यायालयातून जामीन मिळाला. परिणामी या तस्करीत गुंतलेले बाहेरच्या बाहेरच राहिले.
दोन वर्षांपूर्वीच कारागृहात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेल्या सोळंकीचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने कारागृह अधीक्षक अनुपकुमर कुमरे यांनी त्याच्यावर अन्य तुरुंग रक्षकांना नजर ठेवायला सांगितले होते. सोळंकी बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कारागृहात दाखल होताच कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली. त्याच्या डाव्या पायाच्या सॉक्समध्ये २७ ग्रॅम चरस आढळली. ती जप्त करून त्याला धंतोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. धंतोली पोलिसांनी थातूरमातूर पद्धतीने हे प्रकरण हाताळून सोळंकीला गुरुवारी न्यायालयात हजर केले. पोलिसांकडून भक्कम कारवाई दर्शविली गेली नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळाला. दरम्यान, तो रंगेहाथ पकडला गेल्यामुळे कारागृह
अधीक्षक कुमरे यांनी त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आणि तिकडून मंजूरी मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याला निलंबित केले.
---
घरच्यांना धक्का
आरोपी सोळंकी हा मूळचा अकोल्यातील रहिवासी आहे. तो अत्यंत सधन आणि शिक्षित कुटुंबातील सदस्य आहे. अवघ्या तीन हजारांसाठी त्याने आपली नोकरी डावावर लावल्याने त्याच्या घरच्यांना धक्का बसला आहे.
---