तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा

By नरेश डोंगरे | Published: August 25, 2023 02:43 PM2023-08-25T14:43:14+5:302023-08-25T14:44:15+5:30

ईव्हेन्ट ट्रूपचे नाव : बेमालूमपणे चालतोय हा गोरखधंदा

Marijuana smuggling is being done by young women, Ganja is brought by railway trains | तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा

तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा

googlenewsNext

नरेश डोंगरे

नागपूर : रेल्वे गाड्यांमधून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. विशेष म्हणजे तस्करांनी गांजा तस्करीत 'ईव्हेन्टस् ट्रूप' मध्ये काम करणाऱ्या तरुणींना गांजा तस्करीत गुंतवले असून त्यांच्याकडून बेमालूमपणे हा गोरखधंदा करवून घेतला जात आहे. अधून मधून रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई होत असली तरी तस्करीच्या प्रमाणात कारवाईचे प्रमाण खूपच कमी आहे.

गांजा तस्करीसाठी तस्करांकडून रेल्वे गाड्यांचा वापर केला जातो. ओडिशातील संभलपूर हे गांजा तस्करीचे हब समजले जाते. त्यामुळे तिकडून येणाऱ्या गाड्यांमधून एक किलो, दोन किलो, पाच किलो गांजाचे पॅक (बॉक्स) बणवून गांजाचे पार्सल ठिकठिकाणी रवाना केले जाते. प्रारंभी गांजा तस्करीसाठी गरीब, गरजू महिला-पुरुष आणि बेरोजगार तरुणांचा वापर केला जात होता. त्यांना जाण्या-येण्याचे तिकिट आणि एका खेपचे दोन ते पाच हजार रुपये दिले जात होते. मात्र, अनेकदा त्यांच्या संशयास्पद वर्तनामुळे ते पकडले जातात. त्यामुळे आता बड्या तस्करांनी आपला पॅटर्न बदलला आहे. त्यांनी गांजा तस्करीसाठी चक्क तरुणींनाच कामी लावले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 'ईव्हेन्ट ट्रूप'च्या गोंडस नावाआड गरिब तरुण-तरुणींना ठिकठिकाणी नेले जाते. तेथे कार्यक्रमात कॅटरिंग किंवा अन्य कोणती जबाबदारी त्यांना दिली जाते. कार्यक्रम आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना तरूणींच्या पर्समध्ये गांजाचे पँकिंग ठेवले जाते. ती पर्स ठरलेल्या ठिकाणी दुसऱ्या कुणाच्या हवाली करायची असते. त्याचे नाव, नंबर तरुणीला दिला जात नाही. पर्स घेणारा तुम्हाला संपर्क करून तोच तुमच्याकडे पर्स घ्यायला येईल, असे सांगितले जाते.

किरकोळ वाटणाऱ्या या धोक्याच्या कामासाठी संबंधित तरुणीच्या हातात टीप म्हणून ५०० ते १ हजार रुपये ठेवले जाते. महागडी दिसणाऱ्या पर्सच्या आतमध्ये काय आहे, त्याची माहिती नसल्याने तरुणीही सहज तयार होते. चांगले राहणीमान आणि कपडे घालून प्रवास करणाऱ्या या तरुणींची तपासणी होत नसल्याने गांजाची खेप त्यांच्या माध्यमातून नियोजित ठिकाणी, ठरावीक तस्कराच्या हातात बेमालूमपणे पोहचविली जाते.

विविध प्रांतात पोहचवली जाते खेप

प्रत्येक रेल्वेस्थानकावर ठरलेले तस्कर किंवा एजंट गांजाची डिलिव्हरी घेतात. नागपुरात गांजा आल्यानंतर येथून तो महाराष्ट्रात ठिकठिकाणी तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दिल्लीकडे पाठविला जातो.

९५ किलो गांजा जप्त

अधून मधून रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गांजा जप्त करण्याची कामगिरी बजावतात. यावर्षी ८ महिन्यात आरपीएफने वेगवेगळी कारवाई करून २३ लाख, ७५ हजार, ८४० रुपये किंमतीचा ९५ किलो, २०० ग्राम गांजा जप्त केला. मात्र, कारवाई आणि जप्तीचे प्रमाण खुपच कमी असल्याचे संबंधित वर्तुळात म्हटले जाते.

Web Title: Marijuana smuggling is being done by young women, Ganja is brought by railway trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.