बाजारपेठ दुसऱ्या दिवशी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:09 AM2021-03-01T04:09:50+5:302021-03-01T04:09:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शनिवार (दि. २७) व रविवारी (दि. २८) कामठी शहरातील अत्यावश्यक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये शनिवार (दि. २७) व रविवारी (दि. २८) कामठी शहरातील अत्यावश्यक सेवा व दुकाने वगळता अन्य दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती. नागरिकांनीही जिल्हा प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विनाकारण घराबाहेर पडणे टाळल्याने दाेन्ही दिवस शहरातील मुख्य व अंतर्गत मार्गांवर शुकशुकाट हाेता.
या काळात शहरातील शासकीय खासगी दवाखाने, मेडिकल स्टाेर्स, किराणा, दूध व भाजीपाल्याची दुकाने वगळता अन्य दुकाने दाेन्ही दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हाेती. यासंदर्भात स्थानिक नगर परिषद प्रशासनाने नागरिकांसह व्यापारी व दुकानदारांना वेळावेळी सूचना देत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले हाेते. शिवाय, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या हाेत्या.
त्याला स्थानिक दुकानदारांसह नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. तहसीलदार अरविंद हिगे, कामठी (जुनी) चे ठाणेदार विजय मालचे, कामठी (नवीन) चे ठाणेदार संजय मेंढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या नेतृत्वातील पथके शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून हाेते. एरवी, शहरातील सदैव गजबजलेला शुक्रवार बाजार परिसरातही दाेन्ही दिवस शुकशुकाट हाेता. या काळात शहरातील प्रमुख मार्गावर पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.