महिनाभरानंतर बाजार समिती पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:23+5:302021-05-13T04:09:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनाच्या दुष्टचक्रामुळे महिनाभरापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार ठप्प पडला होता. खरीप हंगाम आता ...

The market committee resumed after a month | महिनाभरानंतर बाजार समिती पुन्हा सुरू

महिनाभरानंतर बाजार समिती पुन्हा सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोनाच्या दुष्टचक्रामुळे महिनाभरापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार ठप्प पडला होता. खरीप हंगाम आता अगदी तोंडावर आला असताना आणि शेतकऱ्यांची आर्थिक चणचण लक्षात घेता महिनाभरानंतर बाजार समिती पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शासकीय नियमावलींचे पालन करीत आठवड्यातील गुरुवार, शनिवार आणि मंगळवार हे तीन दिवस उमरेडची बाजार समिती सुरू राहणार आहे.

आठवड्यातील गुरुवारी सोयाबीन, तसेच तांदूळ, गहू, तूर, लाख, मसूर आदी शेतमाल बाजारपेठेत आणता येणार आहे. शनिवार आणि मंगळवार हे दोन दिवस चना खरेदीसाठी ठेवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांवर खरीप हंगाम असल्याने खते, बी-बियाणे आदींची खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांकडील शेतमाल बाजार समितीत विकणे आणि यातून आलेल्या रकमेतून कृषीविषयक बाबींची खरेदी करणे असे नियोजन आखले जाते. अशावेळी बाजार समिती बंद ठेवून शेतकऱ्यांना आणखी आर्थिक खाईत कसे ढकलता येईल, अशा प्रतिक्रिया उमरेड बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू यांनी व्यक्त केल्या.

प्रकृती बिघडली तरी पैसा आणणार कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. शिवाय, मागील हंगामातील खते-बियाणांची उधारी देण्याची कसरतही नवीन हंगामात करावी लागत असल्याने या संपूर्ण बाबींचा विचार करीत बाजार समिती सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचे रूपचंद कडू म्हणाले. बाजार समितीमध्ये एकूण ८५ अडते, तर ५४ परवानाधारक व्यापारी आहेत. आम्ही सर्व योग्य काळजी घेऊ आणि नियमावलीचे पालनसुद्धा करू, असे मत नथ्थूजी मेश्राम, अ‍ॅड. विजय खवास आदींनी मांडले.

.....

पीक तारण याेजना

एखाद्या शेतकऱ्याला आताच तातडीने शेतमाल विक्री करावयाचा नसल्यास त्याने शेतमाल पीकतारण योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनसुद्धा बाजार समितीने केले आहे. यामध्ये शेतमालावर ७० टक्के रक्कम तातडीने शेतकऱ्याच्या खात्यात वळती होते. महिन्याकाठी केवळ ५० पैसे व्याजाची आकारणी केली जाते. हरभरा, सोयाबीन, चना (चनोली) आदी पिके या योजनेत तारण ठेवली जातात. याकरिता सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे लागतात, अशी माहिती बाजार समितीचे सचिव प्रकाश महतकर यांनी दिली.

Web Title: The market committee resumed after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.