दिवाळीत एलईडी लाईट्सनी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 11:14 AM2021-10-29T11:14:18+5:302021-10-29T15:13:37+5:30
गांधीबाग, इतवारी, सीताबर्डी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा या दिव्यांनी सजल्या असून, दिवाळीत व्यवसायात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
नागपूर : दिवाळीत घर, दुकान आणि शोरूमच्या सजावटीवर सर्वांचा भर असतो. यंदा आकर्षक आकाशदिव्यांसह घराबाहेर सजावटीसाठी डीजे लाईट आणि बहुरंगी एलईडी सिरिज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय ड्राप लाईट, सिंगर झूमर आणि एलईडी बल्बच्या सिरिज बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या सिरिज १०० रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत आहेत. यंदा कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. गांधीबाग, इतवारी, सीताबर्डी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा या दिव्यांनी सजल्या असून, दिवाळीत व्यवसायात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
काही वर्षांपासून चिनी लाईट्सची बाजारात रेलचेल असायची. पण आता त्याची जागा स्वदेशी एलईडी लाईट्सनी घेतली आहे. त्यानंतरही व्यापारी त्यांच्याकडे असलेला जुन्या चिनी मालाची विक्री करीत आहेत. बाजारात अनेक वर्षांपर्यंत चालणाऱ्या स्वदेशी एलईडी लाईट्सच्या सिरिज एक हजार रुपयापासून आहेत. सर्वच दुकानांमध्ये या लाईटचा झगमगाट दिसत असून ग्राहकांना आकर्षित करीत आहे. एलईडी सिरिजमध्ये अनेक प्रकारचे डिझाईन उपलब्ध आहेत. व्यापारी रूपचंद मोटवानी म्हणाले, दिवाळीत जुन्या असो वा नवीन घराच्या सजावटीसाठी एलईडी सिरिजला मागणी आहे. किंमत जास्त असली तरीही आकर्षक रोषणाईमुळे लोक खरेदी करीत आहेत. नवीन डिझाईनच्या एलईडी सिरिज विजेची बचत करणाऱ्या आहेत.
व्यापारी विजय श्रीरामे म्हणाले, डिझेलच्या वाढत्या किमतीचा परिणाम इलेक्ट्रिक वस्तूंच्या किमतीवर झाला आहे. त्यामुळे लोक दिवाळीत घराची सजावट करण्याऐवजी घराच्या हॉलच्या सजावटीवर भर देत आहेत. सजावटीच्या आकर्षक इलेक्ट्रिक उत्पादनांमध्ये एलईडीच्या पांढऱ्या व निळ्या सिरिज, छोटे बल्ब सिरिज, डीजे लाईट, ड्राप लाईट, एलईडी ओम, चायना सिरिज, एलईडीचे छोटे बल्ब आणि बॅटरीवर चालणाऱ्या सिरिजची विक्री होत आहे. दिवाळीत सर्वस्तरातील लोक वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे बाजारात गर्दी आहे. मल्टी पांढरी सिरिज ७० ते १०० रुपये, एलईडी सिरिज १०० ते २०० रुपये, ड्राप लाईट ५०० ते ६०० रुपयात विक्रीस उपलब्ध आहेत.