गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:37+5:302021-09-10T04:11:37+5:30
नागपूर : भय, काळजी, चिंता अशा कोरोनामय वातावरणाचे मळभ काहीसे दूर झाले आहेत. आता चैतन्यदायी अकरा दिवसांचा गणेशोत्सव शुक्रवारपासून ...
नागपूर : भय, काळजी, चिंता अशा कोरोनामय वातावरणाचे मळभ काहीसे दूर झाले आहेत. आता चैतन्यदायी अकरा दिवसांचा गणेशोत्सव शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने चिताळ ओळ, बडकस चौक, महाल, इतवारी बाजारात खरेदीसाठी कमालीची गर्दी दिसून येत आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. नैराश्यदायी वातावरणाचा नूर पालटून बाजारपेठेत पुन्हा चैतन्य पसरले आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी नोंदणीची मूर्ती गणरायाच्या घोषात घरी नेली. साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सजावटीचा बाजार सजला
मखर, फुले, दिव्यांच्या माळा, दिवे, कागदी व कापडी तोरण, हार, पूजेचे व प्रसादाचे साहित्य आदींनी बाजार सजला आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यंदा निर्बंधामुळे गणेशमूर्ती वाजतगाजत कुणीही नेली नाही. त्यामुळे ब्रॅण्ड, ढोलताशाचा व्यवसाय बुडाला. यंदा सजावटीच्या साहित्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. चीनमधून माल येणे बंद झाल्याने देशांतर्गत तयार होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय मूर्तिकारांनाही आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. याशिवाय कच्चा मालाच्या किमती वाढल्याने यंदा मूर्तिकारांनी गणेश मूर्तीच्या किमती दीडपटीने वाढविल्या असून दोन हजारांपासून २० हजारांपर्यंत किंमत आहे.
यंदा भक्तीचा उत्सव १०० कोटींचा!
दरवर्षी गणेशोत्सवात नागपुरात जवळपास २०० कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लोकांची बाजारपेठेत प्रचंड गर्दी आहे. राज्य सरकारच्या नियमांमुळे घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा बंधने आहेत. त्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत १०० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. सजावटीच्या वस्तूंना यंदा मागणी कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.