पाडव्याच्या खरेदीचा बाजारात गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 10:51 AM2019-04-06T10:51:22+5:302019-04-06T10:53:06+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे. यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे. यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून येत आहे. ६ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तासाठी दुकानदार सज्ज आहेत. बिल्डर्स नवीन प्रकल्पांचे उद्घाटन या शुभमुहूर्तावर करणार आहेत. जीएसटीत सवलत असल्यामुळे घर खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमध्ये नामांकित कंपन्यांच्या विविध उत्पादनांवर आॅफर आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नामांकित कंपन्या आणि दुकानदारांनी जाहिराती दिल्या आहेत. विविध वस्तूंच्या खरेदीवर आर्थिक सवलत आणि कॅशबॅकची आॅफर आहे. याशिवाय एकावर दुसरे उत्पादन मोफत देण्यात येत आहेत. एलएडी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, मोबाईलसह विविध वस्तूंकडे ग्राहकांचा कल आहे. सर्व वस्तू फायनान्सवर ग्राहकांना खरेदीची संधी असून ग्राहकांमध्ये उत्साह असल्याचे श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे श्रीकांत भांडारकर यांनी सांगितले. शहरात ३०० पेक्षा जास्त शोरूममध्ये २५ कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. पूर्वीच बुकिंग केलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या गुढीपाडव्याला घरी नेण्याची प्रथा आहे. दुचाकी कंपन्यांमध्ये होंडा, हिरो, टीव्हीएस, महिंद्र, यामाहा, सुझुकी आणि विविध इलेक्ट्रिक कंपन्यांचा समावेश आहे. यादिवशी चार हजारांपेक्षा जास्त दुचाकीची विक्री होणार आहे. मारुती सुझुकी, होंडा, ह्युंडई, टोयोटा, टाटा या कंपन्यांच्या गाड्यांना मागणी आहे. तसेच लक्झरियस कारमध्ये मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, आॅडी, स्कोडा या गाड्यांकडे ओढा दिसून येत आहे. सर्व वाहनांचे बुकिंग आधीच झाले आहे. या दिवशी जवळपास एक हजार चारचाकींची विक्री होण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तूंना मागणी
गुढीपाडव्याला किमान एक ग्रॅम सोने खरेदीची प्रथा आहे. शुक्रवारी शुद्ध दहा ग्रॅम सोन्याचे दर ३२,८९० रुपयांवर पोहोचल्यानंतरही ग्राहकांमध्ये उत्साह आहे. नामांकित सराफा शोरूममध्ये चांदीची गुढी विक्रीस असून दरवर्षी मागणी वाढत असल्याचे सराफांनी सांगितले. याशिवाय बाजारात प्रचलित एक आणि दोन ग्रॅमच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. तसेच पूर्वीच आॅर्डर केलेले दागिने ग्राहक गुढीपाडव्याला घरी नेणार आहे. लग्नसराईच्या दागिन्यांची आॅर्डर ग्राहकांनी पूर्वीच दिलेली आहे. सर्वच शोरूमच्या संचालकांनी आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचा संग्रह केला आहे. यादिवशी सोने आणि चांदीच्या नाण्यांना मागणी असते. गुढीपाडव्याला सराफा बाजारात ४० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.