बाजारपेठांमध्ये उत्साहाचा रंग, होळीची उलाढाल १० कोटींची!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 12:17 PM2023-03-06T12:17:32+5:302023-03-06T12:22:43+5:30
रंग, गुलाल, पिचकारी, गाठींनी बाजारपेठा सजल्या : व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह
नागपूर : होळी सणानिमित्त सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. रेशीम ओळ, लोहा ओळ आणि इतवारी बाजारात रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवटे खरेदीसाठी मोठ्यांसह बच्चे कंपनीने मोठी गर्दी केली आहे. विदर्भाची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नागपुरात यंदा सर्वच वस्तूंची उलाढाल जवळपास १० कोटींची होण्याची शक्यता आहे.
इतवारीतील व्यापारी राजू माखिजा म्हणाले, यंदा मनसोक्त होळी खेळण्याचे लोकांचे नियोजन आहे. फ्लॅट स्कीम, कॉलनी आणि मोहल्ल्यांमध्ये आतापासून होळीचा उत्साह संचारला आहे. होळीला रंग, गुलाल आणि गाठ्यांची सर्वाधिक विक्री होते. गुलाल उत्पादकांनी जानेवारीपासूनच उत्पादन सुरू केले आणि माल फेब्रुवारीमध्येच शहर, तालुके आणि राज्याच्या अन्य भागात विक्रीसाठी पाठविला.
यंदा विदर्भात सर्वाधिक नागपुरी गुलालाची विक्री होणार आहे. याशिवाय रेशीम ओळीत रंगाची जास्त दुकाने आहेत. यंदा रंगाच्या किमती दुपटीवर गेल्या आहेत. चांगल्या दर्जाच्या लाल रंगाची किंमत ३० रुपये तोळा (१० ग्रॅम) आहे. होळीला जवळपास एक कोटीचा रंग विकला जातो. पारंपरिक गुलाल १०० ते ११० रुपये, तर हर्बल गुलाल १३० ते १४० रुपये किलो आहे. रंग आणि गुलालाची बाजारपेठ ४ कोटींची आहे.
गाठी ९० ते ११० रुपये किलो
होळीला आप्ताप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मित्रमंडळी आणि नातेवाइकांना साखरेपासून तयार केलेल्या गाठी भेट देण्याची प्रथा आहे. होळीनिमित्त नागपुरातील जवळपास २५ ते ३० उत्पादक एक महिन्याआधीच गाठीचे उत्पादन करतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाव १०० ते १२० रुपयांपर्यंत उतरले आहेत. दोन ते तीन किलो वजनातील आकर्षक डिझायनर गाठी १३० ते १४० रुपये किलो आहे. नागपुरी गाठी संपूर्ण विदर्भात विक्रीसाठी जातात. किराणा दुकानदारांपासून हातठेल्यावरही गाठीची विक्री होते.
पिचकारी व मुखवट्यांची विक्री
इतवारीत पिचकारी, मुखवटे आणि अन्य वस्तूंचे ठोक विक्रेते आहेत. सर्व व्यापारी चीनमधून मुंबईत उतरणारा माल विक्रीसाठी नागपुरात येतात. हा माल संपूर्ण विदर्भात विक्रीसाठी जातो. यंदा ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत पिचकारी, २० ते २०० रुपयांपर्यंत मुखवटे विक्रीला आहेत. बुधवारी ग्राहकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या वस्तूंची बाजारपेठ जवळपास दोन कोटींच्या घरात आहे.
होळीमुळे छोट्या विक्रेत्यांना सुगीचे दिवस
होळी सणामुळे छोट्या विक्रेत्यांना रंग, गुलाल, गाठी विक्रीतून चांगला नफा मिळतो. यंदा विक्रेत्यांमध्ये उत्साह आहे. अनेकजण हातठेल्यावर मालाची विक्री करीत असल्याचे चित्र अनेक चौकांत दिसत आहे. या सणामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन होत असल्याचे मत महाल चौकातील विक्रेते रशीद यांनी व्यक्त केले.
गुलाब फुलांना असते मागणी
उपराजधानीत फुलांच्या होळीची क्रेझ वाढत आहे. होळीत रसायनापासून तयार झालेल्या रंगाने त्वचेला नुकसान होत असल्यामुळे नैसर्गिक फुलांनी अर्थात गुलाबाच्या पाकळ्यांनी होळी खेळण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे स्थानिक लाल गुलाबाला मागणी वाढली आहे. ठोक बाजारात भाव ६० ते ८० रुपये किलो असल्याचे विक्रेते जयंत रणनवरे यांनी सांगितले.