परीक्षेतील गुण म्हणजे बुद्धिमत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:25 AM2018-06-15T10:25:47+5:302018-06-15T10:25:57+5:30
केवळ परीक्षांमधील गुण म्हणजे बुद्धिमत्ता ठरत नाही असे मत माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी-बारावीत कमी गुण मिळाले म्हणून यशाचे शिखर गाठण्याचे मार्गच संपले असे होत नाही. अभियांत्रिकी व मेडिकलशिवायदेखील ‘करिअर’चे अनेक पर्याय उपलब्ध असतात. आपल्याकडील मानसिकता केवळ पुस्तकी अभ्यासाच्या गुणांना सर्वोत्तम मानणारी झाली आहे. मात्र केवळ परीक्षांमधील गुण म्हणजे बुद्धिमत्ता ठरत नाही. परीक्षेत कमी गुण मिळविणारे अनेकदा आयुष्याच्या स्पर्धेत जिंकलेले दिसून येतात, असे मत माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’ व चाणक्य मंडळ परिवारतर्फे ‘दहावी-बारावीनंतर करिअर आणि स्पर्धा परीक्षा’ या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मुलांचे करिअर घडविण्यात पालक व शिक्षकांची मौलिक भूमिका असते. अमूक गुण मिळाले म्हणून अमक्या अभ्यासक्रमालाच प्रवेश घेतला पाहिजे असे नसते. विद्यार्थ्याची आवड लक्षात घेऊन त्यांना दिशा दाखविली पाहिजे. मात्र गुणांच्या स्पर्धेत अभ्यासक्रमांची चौकट निश्चित करण्यात आली आहे. मुळात विज्ञानासह वाणिज्य, कला शाखेतील अभ्यासक्रमांत शिक्षण घेतल्यानंतरदेखील उत्तम करिअर करता येते.
अभियांत्रिकीकडे जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र सर्वात जास्त बेरोजगारी तर याच क्षेत्रात दिसून येते. दुसरीकडे स्पर्धा परीक्षांकडे विशिष्ट पदवीच फायदेशीर ठरते हा गैरसमजदेखील दूर करण्याची गरज आहे, असे धर्माधिकारी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सर्वात अगोदर स्वत:मधील ‘मी’ ओळखावा, त्यानंतर आपल्या आवडीनुसार दिशा ठरवावी आणि ज्या क्षेत्रात जायचेय तेथे कष्टाने प्रतिभावंत व्हायचेय याच विचाराने जावे. आयुष्यात विद्यार्थ्यांनी ही त्रिसूत्री नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, असेदेखील प्रतिपादन अविनाश धर्माधिकारी यांनी केले. विदर्भातदेखील स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनंदन पळसापुरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणे महत्त्वाचे
यावेळी आ.अनिल सोले यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून ‘फॉर्च्युन फाऊंडेशन’चे काम व या आयोजनामागील भूमिका मांडली. विदर्भातील तरुणांना करिअरची योग्य दिशा मिळाली पाहिजे व त्यांना रोजगारासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’ला तर दुसऱ्या राज्यांमधूनदेखील मुले येत आहेत. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. ही बाब जास्त महत्त्वाची आहे, असे मत अनिल सोले यांनी व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीत व्यायामाला महत्त्व द्या
यावेळी ऋषिकेश मोडक यांनी ‘यूपीएससी’ची तयारी करताना त्यांना आलेला अनुभव कथन केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तणाव येऊ न देणे सर्वात महत्त्वाचे असते. दिनक्रमात अभ्यासाप्रमाणे व्यायाम व खेळ यांनादेखील स्थान देणे आवश्यक आहे. सोबतच एखाद्या परीक्षेची तयारी करताना संबंधित क्षेत्रात का जायचे आहे, याचे उत्तर तुम्हाला माहीत हवे, असेदेखील त्यांनी सांगितले.
सरकारी यंत्रणा अहंकार फुगविणारी
सरकारी यंत्रणा आणि एकूण रचना ही अहंकार फुगविणारी असते. त्यामुळे या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यासाठी अहंकारावर मात करणे आवश्यक ठरते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना या बाबींचा विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन अविनाश धर्माधिकारी यांनी केले.